शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्कोवर ?

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जांवर निर्णय घेण्यास मुंबई महापालिकेकडून निव्वळ वेळकाढूपणा सुरू आहे, तर दुसरीकडे एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदान शिंदे गटासाठी आरक्षित करीत शिवसेनेचा अर्ज फेटाळल्याने शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे.

shivsena dasara melava 2018

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जांवर निर्णय घेण्यास मुंबई महापालिकेकडून निव्वळ वेळकाढूपणा सुरू आहे, तर दुसरीकडे एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदान शिंदे गटासाठी आरक्षित करीत शिवसेनेचा अर्ज फेटाळल्याने शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे. दसर्‍याला जेमतेम १५ दिवस शिल्लक असतानाही मैदान मिळत नसल्याने पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

महापालिकेकडून दोन्ही गटांना सभेसाठी परवानगी नाकारण्यात येण्याचीच शक्यता अधिक आहे. तसे झाल्यास शिंदे गटाकडे बीकेसीतील एमएमआरडीच्या मैदानाचा तरी पर्याय उपलब्ध आहे, परंतु शिवसेना दसरा मेळावा कुठे घेणार याची चिंता सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनाही सतावू लागली आहे. अशा स्थितीत शिवसेनेपुढे गोरेगावातील नेस्को संकुलाचा एकमात्र पर्याय समोर उरत आहे.

शिवसेनेचे नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी २२ ऑगस्ट रोजी, तर शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी ३० ऑगस्ट रोजी महापालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता, परंतु दसरा मेळाव्याचे प्रकरण तापल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने विधी व न्याय विभागाकडून अहवाल मागितला आहे. या अहवालानंतरच महापालिका काय तो निर्णय घेईल. दरम्यान, शिंदे गटाने केलेल्या अर्जावर निर्णय घेत एमएमआरडीएने बीकेसीतील मैदान शिंदे गटासाठी आरक्षित केले आहे.

पहिल्या अर्जाला पहिले प्राधान्य हाच निकष असेल, तर आम्हाला शिवाजी पार्क मिळालेच पाहिजे ही भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली आहे. एवढेच काय तर महापालिकेने परवानगी नाकारल्यास शिवसेनेने न्यायालयात जाण्याचीही तयारी ठेवली आहे, परंतु दसरा मेळावा कुठे घेणार हा प्रश्न उरतोच. बीकेसी वगळता सायन येथील सोमय्या मैदान आणि गोरेगावातील नेस्को संकुल ही दोन ठिकाणे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी योग्य ठरू शकतात. या दोन ठिकाणांपैकी सोमय्या मैदान हे आकाराने लहान असून नेस्को संकुलाची जागा त्या तुलनेत मोठी आहे. त्यामुळे शिवसेनेकडून नेस्को संकुलाची दसरा मेळाव्यासाठी निवड होऊ शकते.

नेस्कोसोबतचे जुने कनेक्शन
नेस्को संकुल हे शिवसेनेसाठी नवे नाही. शिवसेना पदाधिकारी, गटनेत्यांच्या बैठका नेस्को संकुलावर अधूनमधून होतच असतात. गिनीज बुकात नोंद झालेले शिवसेनेचे महारक्तदान शिबिरही नेस्को संकुलातच आयोजित करण्यात आले होते. त्यातच २१ सप्टेंबरला मुंबईतील शिवसेना नेते, उपनेते, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आदी पदाधिकार्‍यांचा मेळावा नेस्को संकुलात होत असून या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात मुंबईतील सेनेचे ३० ते ३५ हजार पुरुष व महिला पदाधिकारी सहभागी होणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

दसरा मेळाव्यासाठी फक्त शिवाजी पार्क, अशा हटवादी भूमिकेत सध्या शिवसेना नेते आहेत, परंतु महापालिकेने परवानगी नाकारल्यास ना शिवाजी पार्क, ना बीकेसीतील मैदान अशा कोंडीत शिवसेना अडकणार आहे. तेलही गेले, तूपही गेले, हाती उरले धोपाटणे, अशी अवस्था टाळण्यासाठी अखेर शिवसेनेला यंदाचा दसरा मेळावा नेस्को संकुलातच घेण्याचा कटू निर्णय घ्यावा लागेल असाच सर्वांचा होरा आहे.

सत्ताधार्‍यांकडून अधिकार्‍यांवर दबाव 
शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा हे एक समीकरण आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही रितसर परवानगी मागत आहोत, परंतु सत्तेचा माज दाखवून अधिकार्‍यांवर दबाव टाकून शिवसेनेची कोंडी केली जात आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा होऊ नये यासाठी कटकारस्थान करण्याचा प्रयत्न कोणाकडून सुरू आहे हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. एमएमआरडीएच्या मैदानाची परवानगी शिंदे गटाला देण्यात आल्याचे समजले. आता शिवसेना पक्षप्रमुख जे ठरवतील त्याला शिवसैनिक पाठिंबा देतील.
– किशोरी पेडणेकर, माजी महापौर, शिवसेना

पालिका विधी खात्याकडे प्रस्तावच आला नाही
दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी द्यायची याबाबत महापालिकेच्या विधी विभागाकडे अभिप्राय मागितल्याचे जी/उत्तर विभागाकडून सांगण्यात आले होते, मात्र विधी विभागाकडे अभिप्रायासाठी कोणताही प्रस्ताव आलाच नाही, असे विधी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी विचारणा करण्यासाठी जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच विधी विभागाच्या स्पष्टीकरणावर भाष्य करण्याचे सपकाळ यांनी टाळले.

शिवाजी पार्क शिवसेनेला द्या! – शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हेच समीकरण मागील अनेक वर्षांपासून आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा आहे. त्यात काही गैर नाही, अशी पाठराखण करतानाच शिवसेनेला त्यासाठी परवानगी दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोमवारी केली.

सोलापूरच्या दौर्‍यावर असलेले शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या ओढाताणीवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परंपरा सुरू केली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत आहे. दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे. ती लक्षात घेता त्यांनी केलेली मागणी गैर नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली.

तसेच एकनाथ शिंदे यांनाही मेळावा घेण्याचा अधिकार आहे. तेही घेऊ शकतात, पण त्यासाठी त्यांनी बीकेसीचे मैदान मागितले. तेही सरकारने दिले. मग दुसर्‍यांना त्यांनी विरोध करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देणे अपेक्षित आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.