‘गलिच्छ राजकारणामध्ये माझ्या घराचे…’, एसबीच्या चौकशीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया

शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसबी चौकशी सुरू असून, त्यांच्या रत्नागिरी येथील घराची आज मूल्यांकन करण्यात आले आहे. घरात एसबीकडून मूल्यांकन होत असताना आमदार राजन साळवी यांना अश्रू अनावर झाले.

शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसबी चौकशी सुरू असून, त्यांच्या रत्नागिरी येथील घराची आज मूल्यांकन करण्यात आले आहे. घरात एसबीकडून मूल्यांकन होत असताना आमदार राजन साळवी यांना अश्रू अनावर झाले. तसेच, ‘हे घर मोठ्या कष्टाने उभारले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने केले गेलेले मोजमाप वेदनादायी होते’, अशा भावना राजन साळवी यांनी बोलून दाखवले. (Shiv sena thackeray group mla rajan salavi getting emotional)

एसीबीने दिलेल्या नोटिसीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मूल्यांकन केले. राजन साळवी यांच्या घरी अधिकारी मोजमाप करण्यासाठी आले त्यावेळी ते देवपूजेला बसलेले होते. यावेळी राजन साळवी यांना आपल्या भावना अनावर झाल्या. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे रडायचं नाही आता लढायचे, असा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवला.

“मी उभं केलेल्या माझ्या घराचे आज माझ्यासमोरच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप केले. मी त्यांना घरातील हॉल, किचनमध्ये, बेडरुममध्ये येऊन मोजमाप करताना पाहिले. ज्या गोष्टी उभ्या केल्या त्याचे मोजमाप घेताना पाहिले. या गोष्टीचे खूप वाईट आणि दु:ख वाटले. चित्रपटात जसे पाहतो ना एखादे घर लिलावत जाण्याआधी त्याची आधी जप्ती होते, त्याचे मोजमाप केले जाते. त्याचपद्धतीने मोजमाप घडताना पाहिले. माझ्या घरावर 25 लाखांचे कर्ज आहे. त्याचा मी हप्ता व्यवस्थित भरतोय. पण गलिच्छ राजकारणामध्ये माझ्या घराचे लिलावासारखे मोजमाप करण्यात आले. या गोष्टीचे दु:ख मला होते. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. ज्या पद्धतीने मला मानसिक त्रास दिला जातोय त्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय दु:खी आहेत. माझा विश्वास आहे, आतापर्यंत जे मी कमवले ते मी माझ्या व्यवसायातून उभे केलेले आहे. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. माझ्या मागे लागलेला हा चौकशीचा ससेमिरा आगामी काळात दूर होईल, अशी आशा बाळगतो. शासनाच्या वतीने कर्मचारी आले त्यांनी घराचे मोजमाप घेतले तो त्यांचा अधिकार आहे”, अशा भावना राजन साळवी यांनी व्यक्त केल्या.


हेही वाचा – कोण इम्तियाज जलील?, नशीब ठाकरेंनी त्यांना पाठिंबा नाही दिला; आशिष शेलारांचा हल्लाबोल