कोण इम्तियाज जलील?, नशीब ठाकरेंनी त्यांना पाठिंबा नाही दिला; आशिष शेलारांचा हल्लाबोल

औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमकडून आंदोलन करण्यात येत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करत आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या उपोषणावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टिका करत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून जलील आणि ठाकरेंवर टीका केली. कोण इम्तियाज जलील?, त्याचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी काय संबंध?, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत त्यांना काय माहितेय?, या अशा बांडगुळांना आम्ही उत्तर देत नाही, असं आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांनी ट्वीट करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. नशीब इम्तियाज जलील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे किंवा खैरे गेले नाहीत, असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंना टोला लगावला.

नामांतराच्या निर्णयाला एमआयएमने विरोध केल्यावर मनसेकडून जलील यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जलील रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असतील, तर आम्ही देखील आंदोलन करुन उत्तर देऊ, असा इशारा मनसेने दिला होता. दरम्यान जलील यांनी उपोषणाची घोषणा करताच मनसेकडून देखील स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे.


हेही वाचा : औरंगाबाद नामांतराविरोधात MIMचं साखळी उपोषण; तर मनसेकडून स्वाक्षरी मोहीम