शिवभोजन थाळीचा जिल्हयातील ७ हजार जणांना होणार लाभ

४५ केंद्रावर आजपासून अंमलबजावणी

shivbhojan thali

कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात बुधवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या निर्बंधामुळे गोरगरीब, गरजू नागरीकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या निर्णयाचा नाशिक जिल्हयातील ७ हजार जणांना लाभ होणार आहे.

गरिबांना कमी पैशात जेवण उपलब्ध व्हावे, याकरिता राज्य सरकारने शिवभोजन थाळीला सुरूवात केली. सुरूवातीला १० रूपयांना ही थाळी मिळत होती. गतवर्षी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि हातावर पोट असणार्‍यांवर उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन शिवभोजन थाळी हा उपक्रम तालुका पातळीवरही राबविण्यात आला. तसेच ही थाळी दहा रूपयांऐवजी पाच रूपयांना देण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढू लागल्याने सरकारने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणार्‍यांचे हाल होउ नयेत यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. नाशिक जिल्हयात आजपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या निर्णयामुळे कोरोनाच्या संकटात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

शिवभोेजन केंद्रे
नाशिक शहरात : १३
तालुका स्तरावर : ३२
जिल्हयातील एकूण शिवभोेजन केंद्रे  :४५
दररोज किती जणांना मिळणार लाभ : ७०००

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानूसार जिल्हयात आजपासून शिवभोजन थाळी मोफत वाटप सुरू करण्यात आले आहे. जिल्हयातील ४५ केंद्रावर ही थाळी उपलब्ध होणार असून जिल्हयाला ७ हजार थाळींचे उदिदष्ट देण्यात आले आहे.
अरविंद नरसीकर,
जिल्हा पुरवठा अधिकारी