घरमहाराष्ट्रHathras Rape Case: हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला? - शिवसेना

Hathras Rape Case: हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला? – शिवसेना

Subscribe

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण आणि बलरामपूर बलात्कार प्रकरणावरुन शिवसेनेने ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ नसून ‘जंगलराज’ आहे, अशी टीका शिवसेनेने योगी सरकारवर केली आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱ्या योगींची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? असा सवाल शिवसेनाने केला आहे.

“उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ वगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. हाथरसमध्ये १९ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार व नंतर खून झाला. त्यानंतर देशात गदारोळ उडाला आहे. मरणाच्या दारात असताना तिने बलात्कार झाल्याचे सांगितले. आता उत्तर प्रदेशचे सरकार म्हणते बलात्कार वगैरे सगळे झूठ आहे. पाठोपाठ बलरामपूरमध्येही सामूहिक बलात्काराचे प्रकरण झाले, पण ना दिल्लीतील अश्रूंचा बांध फुटला ना योगी सरकारच्या डोळय़ांच्या कडा ओलावल्या. बलात्कार झालाच नाही तर विरोधकांनी बोंबलायचे कशाला? असे सरकारच बोंबलत आहे. बलात्कार झालाच नाही, तर रात्रीच्या अंधारात त्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी पेट्रोल ओतून का जाळला?” असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

- Advertisement -

“पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या राहुल गांधी यांना अडवलेच, पण त्यांना कॉलर पकडून धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले. देशातील एका प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यास असे वागवणे, अपमानित करणे हे लोकशाहीवर ‘गँगरेप’ होत असल्याचेच लक्षण आहे. राहुल गांधी हे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. राहुल गांधी हे महान इंदिरा गांधींचे नातू व तडफदार राजीव गांधींचे सुपुत्र आहेत. इंदिरा व राजीव गांधी यांनी देशाच्या सार्वभौमत्वासाठी हौतात्म्य पत्करले, पण देशासाठी रक्त तर सोडाच, घामाचा, त्यागाचा एक थेंबही ज्यांनी सांडला नाही अशा सत्ताधीशांच्या आदेशाने राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्यात आला. ”महिलांवरील बलात्कार, अत्याचारांबाबत आवाज उठवाल तर याद राखा” असेच जणू योगी सरकारने बजावले आहे.”

“मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून ‘कर्कश’ मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत. देश इतका निर्जीव, हतबल कधीच झाला नव्हता. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीची बाबरी पाडली म्हणून पेटलेला हा देश एका मुलीच्या देहाची विटंबना होऊनही थंड पडला असेल तर या देशाने सत्त्व गमावले आहे, समाज नपुंसक बनला आहे व मतदार गुलाम झाला आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -