विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

विधानपरिषदेतील शिवसेना आमदारांची ९ जुलै रोजी मातोश्रीवर बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता, गटनेता, प्रतोद नियुक्तीचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला होता.

cm uddhav thackeray
बंडखोरीमुळे राज्यातील सत्ता गमवावी लागल्यानंतर आता शिवसेनेने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे विधानपरिषदेचे सर्वाधिक १३ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्यात आला आहे. विधान परिषदेत नवा विरोधी पक्षनेता नेमला जावा यासाठी  शिवसेना आमदारांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र सुपूर्द करण्यात आले आहे. यावेळी आमदार अंबादास दानवे, सचिन अहिर, मनीषा कायंदे, विलास पोतनीस, सुनील शिंदे आदी नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचा ठरावही गोऱ्हे यांच्याकडे सोपवण्यात आला. दरम्यान, विधानपरिषदेतील शिवसेना आमदारांची ९ जुलै रोजी मातोश्रीवर बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता, गटनेता, प्रतोद नियुक्तीचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला होता. (Shivsena in action mode for Leader of Opposition in the Legislative Council)
सध्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांच्याकडे गेले होते. त्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या पदासाठी सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत चुरस आहे. राज्याच्या विधानपरिषदेत एकूण ७८ आमदार आहेत. मविआत शिवसेनेचे विधानपरिषदेत सर्वाधिक १३ आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेतील आमदारांच्या संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपदावर आमचा हक्क असल्याची भूमिका शिवसेना नेते सचिन अहिर यांनी मांडली आहे.
मात्र, विधानपरिषदेत सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे. आमच्याकडे एकनाथ खडसे यांच्यासारखे सरकारला धारेवर धरू शकणारे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपदही आम्हालाच मिळावे, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे.