घरमहाराष्ट्रराणेंना धक्का देण्यासाठी शिवसेनेची आणखी एक खेळी!

राणेंना धक्का देण्यासाठी शिवसेनेची आणखी एक खेळी!

Subscribe

गणपतीमध्ये चिपी विमानतळावर पहिले विमान उतरल्यानंतर ऐन गणपतीमध्ये कोकणात आरोप-प्रत्यारोपाचा शिमगा पहायला मिळाला होता. मात्र आता याच चिपी विमानतळावरून शिवसेना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आगमी लोकसभा निवडणूकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. त्यातच शिवसेना भाजपाची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. मात्र आचारसंहिता लागण्याआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्याचा हेतू शिवसेनेचा असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिपी विमानतळाचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते उद्घाटन करून पालकमंत्री दिपक केसरकर राणेंना धक्का देण्याची तयारी करत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणूकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे रिंगणात उतरले आहेत. मात्र जे काम नारायण राणे सत्तेत असताना पूर्ण करू शकले नाहीत तेच काम शिवसेनेने करून दाखवले हेच दाखवण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी प्रयत्न करत आहे. चिपी विमानतळाचे काम पूर्ण झाले असून गणपतीमध्ये पहिले विमान धावले होते. मात्र आता हे विमान लोकांसाठी खुले व्हावे तेही निवडणुकीच्या आधी असा प्रयत्न शिवसेनेचा असून विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची वेळ घेतली जात असून, त्यांच्यावेळेनुसारच उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे.

- Advertisement -

चिपी विमानतळ आता पूर्णत: तयार असून, आचारसंहिते पूर्वी या विमानतळावर विमान धावतील. तसेच या विमानतळाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करणार आहोत. मात्र या तिन्ही नेत्यांची वेळ मिळाल्यानंतर तारीख निश्चित केली जाईल.
– दिपक केसरकर, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

उद्घाटनाला शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तिन्ही नेत्यांची तारीख निश्चित झाली की, शिवसेनेकडून कोकणात मोठ मोठे फलक लावून शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याची माहिती देखील आपलं महानगरला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच यावेळी कोकणातले शिवसेनेचे नेते देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करून जे राणे इतकी वर्षे कोकणात करू शकले नाही ते आम्ही साडेचार वर्षात करून दाखवले असा प्रचार देखील शिवसेना यावेळी करणार आहे.

- Advertisement -

राणे पिता-पुत्रांनी काय केला होता आरोप

दरम्यान, गणपतीमध्ये पहिलेवहिले विमान चिपी विमानतळावर उतरल्यानंतर नारायण राणे यांनी डीजीसीएची परवानगी नसताना हे विमान कसं उतरवण्यात आलं? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेवर टीका केली होती. त्यामुळे ऐन गणपतीमध्ये आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले होते. त्यातच काही महिन्यांपूर्वी निलेश राणे यांनी चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर रिक्षा धावत असल्याचा व्हिडिओ काढत तो स्वत:च्या ट्विटवर टाकून शिवसेनेवर टीका केली होती. मात्र आता राणे-पिता पुत्रांच्या याच आरोपाला शिवसेना उद्घाटन करून उत्तर देणार असल्याचे समजत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -