घरदेश-विदेशकरोनाचे साईड इफेक्ट

करोनाचे साईड इफेक्ट

Subscribe

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून ठाणे जिल्हा या नगरीशी जोडून असल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या त्यास अनन्य साधारण महत्व आहे. ठाणे जिल्हा हा औद्याोगिक दृष्या महत्वाचा जिल्हा ओळखला जातो. ठाणे, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर भिवंडी तुर्भे हे औद्योगिकदृष्ट्या विकसित आणि शहरीकरण झालेले भाग आहेत. सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. ६ महानगरपालिका, २ नगरपालिका, सिडको, एमआयडीसी आदी नियोजन प्राधिकरणे असलेला ठाणे हा राज्यातला एकमेव जिल्हा आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो.ठाणे जिल्हयात करोनाबाधित रूग्णांची संख्या दोन हजाराच्या उंबरठयावर येऊन ठेपली आहे. तब्बल दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्हायाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे, रोजगार, उद्योग- व्यवसाय , शिक्षण, शेती, बांधकाम, विकास कामे आदीवर करोनाचे दूरगामी परिणाम पडल्याने अर्थकारण बिघडले आहे, त्यावर आपलं महानगरने टाकलेली नजर ...

एक दृष्टीक्षेप …

जिल्हयाचे क्षेत्रफळ : ४२१४ चौ किमी
एकूण लोकसंख्या : ८०,७००३२ ( २०११ च्या जनजगणनेनुसार )
दरडोई उत्पन्न : १७३१५०
एकूण तालुके : ७
महापालिका : ६
नगरपालिका : २
पंचायत समिती : ५
ग्रामपंचायती : ४३०
गावे : ८०७
शहरे : ३१

- Advertisement -

कारखानदारी संकटात ….

औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ठाणे जिल्हयाचा राज्यामध्ये तिसरा क्रमांक असून जिल्हयाच्या निम्म्यापेक्षा जास्त भागाचा आर्थिक व सामाजिक विकास हा औद्योगिक करणामुळे झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या औद्योगिक वसाहतींची संख्या आठ आहे. मुंबई सारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व सोयीचे बंद, दळणवळणाच्या जलद सेायी यामुळे जिल्हयात उद्योगधंदयाची भरभराट झालेली दिसून येते. जिल्याहत नोंदणी झालेल्या उद्योगात प्रामुख्याने रसायने व औषधे यांचे फार मोठया प्रमाणात उत्पादन केले जाते. याशिवाय प्लास्टीकच्या वस्तू लोखंडी साहित्य आणि पॉवरलूम कापड निर्मिती करणारे मध्यम व छोट उद्योग मोठया प्रमाणात आहेत. भिवंडी येथील यंत्रमागावर कापड विणण्याचा व्यवसाय प्रसिध्द आहे. अंबरनाथ येथे केंद्र शासनाचा दारूगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जिल्याहत मोठया प्रमाणात रोजगार उपब्ध आहे. जिल्ह्यात १० एमआयडीसी, २ सहकारी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यातील प्रमुख उद्योग हे रसायनिक, ऑटोमोबाइल, औषधनिर्मिती, कृत्रिम धागेनिर्मिती, प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या वस्तू निर्मिती, खते, जंतूनाशके, रंग, खाद्य पदार्थ निर्मिती आदी होते. भिवंडीत मोठया प्रमाणावर पॉवरलूम आहेत. जिल्हयात साधारण ९ हजाराच्या आसपास उद्योग आहेत. त्यामध्ये लाखो कामगार कारखान्यात काम करीत आहेत. यामध्ये परराज्यातील कामगारांची संख्या ७० टक्केपर्यंत आहे. तर स्थानिक कामगार हे ३० टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यात लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील कामगार आणि मजुरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी सरकारकडून मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे घरी परतण्यासाठी धावाधाव सुरू झाल्याने कारखानदार चिंतेत सापडले आहेत. कारखान्यातील परराज्यातील ७० टक्के कामगार आपल्या गावी निघून गेल्यावर खूप मोठा फटका बसणार असल्याने कारखानदारी संकटात सापडली आहे.

- Advertisement -

नोंदणीकृत कारखाने – ९०२८
नोंदणीकृत चालू कारखाने – ८६६३
कामगार संख्या – ४३२८०७

बांधकाम व्यवसायाला घरघर ….

मुंबई आणि ठाण्यातील गृहनिर्माणाला आलेली बंधने आणि या भागातील घरांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राने ठाण्यापल्याडच्या भागांमध्ये कूच केले आहे. एमएमआर रिजनमध्ये सुरू असलेल्या एकूण बांधकामापैकी ३३ टक्के बांधकाम हे ठाण्यापल्याडची शहरे आणि ग्रामीण पट्ट्यांमध्ये सुरू आहे. या भागातील जमिनीची किंमत कमी असून घरेसुद्धा कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने तिथे गृहखरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे ठाणे कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात बांधकाम व्यवसाय चांगलाच तेजीत सुरू आहे. मेट्रो, रिंगरूट, आयटी पार्क असे अनेक विकासाचे प्रकल्प भविष्यात साकारले जाणार असल्याने नामवंत बिल्डरांनी या परिसरात मोठया प्रमाणात इन्वेस्टमेंट केली आहे. त्यामुळे अलिशान गृहसंकुले आकार घेत आहेत. ठाणे जिल्हयात साधारण एक हजार बांधकाम प्रोजेक्ट सुरू आहेत. एकिकडे लॉकडाऊनमुळे बांधकामे बंद असतानाच दुसरीकडे परराज्यातील मजूर गावी गेल्याने कामगारांची वाणवा जाणवणार आहे. लॉकडाऊनच्या काळात नवीन घराची एकही बुकिंग न झाल्याने बांधकाम व्यवसायाला घरघर लागली असून, बिल्डर लॉबीचे साधारण एक हजार कोटीपेक्षा अधिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

एकूण : एक हजार प्रोजेक्ट
नुकसान : एक ते दीड हजार कोटी
अवलंबित व्यवसाय : २७५ ते ३००

विकास कामांना खीळ ….

केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत आल्यावर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्रमोदीयांनी देशातील १०० शहरे स्मार्ट करण्याची घोषणा केली, ठाणे व केडीएमसी महापालिकेचा समावेश आहे. त्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अहवाल तयार केला. केडीएमसीत एकूण २४ प्रकल्प असून प्रकल्पाची किंमत १ हजार कोटी आहे. तर ठाणे महापालिकेत स्मार्ट मिशन राज्य सरकार आणि महापालिका निधीतून जवळपास ५४०० कोटीचे प्रकल्प साकारले जाणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, खाडी किनारा विकास, सिटी पार्क माध्यमातून पर्यटन स्थळ, रिंगरूट रेल्वे स्थानक परिसर विकासाचे प्रकल्प प्रशासनाने हाती घेतले आहेत. तसेच मेट्रो, रिंगरूट, आयटी पार्क असे अनेक प्रकल्प भविष्यात साकारण्यात येणार आहेत. मात्र करोनामुळे अर्थकरणावर परिणाम होणार असल्याने त्याचा विकास कामांनाही बसणार आहे. लॉकडाऊनमुळे सगळीच कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे विकास कामांना खीळ बसली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगारावर फटका बसल्याने मालमत्ता कर पाणी पट्टी वसूलीवर परिणाम झाला आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारकडून मिळणा-या अनुदानाला ब्रेक बसला आहे. त्यामुळे शहराच्या विकासावर खूप मोठा परिणम होणार आहे.

शैक्षणिक क्षेत्राला फटका

खासगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा उदरनिर्वाह शालेय फी वर अवलंबून आहे. मात्र राज्य सरकारकडून खासगी शाळांवर फी वसूल करण्यास बंदी केल्याने खासगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे वेतन होऊ शकलेले नाही. करोनामुळे शैक्षणिक क्षेत्र ही आर्थिक संकटात सापडले आहे. तसेच विद्याथ्यांचेही शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

प्राथमिक शाळा- ३३२५
माध्यमिक शाळा – १०८८
उच्च माध्यमिक- ४५७ ,
महाविद्यालये- २२६
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी संख्या -७८२८७१
महाविद्यलयातील विद्यार्थी संख्या – १९७८९४
आदीवासी आश्रमशाळा : ३६
विद्यार्थी संख्या : १५५४०

आठवडी बाजाराचे अर्थकारण बिघडले

करोनाचा इफेक्ट गावातील अर्थकरणावर पडला आहे. आठवडी बाजारावर करोनाचे सावट पसरल्याने आठवडी बाजार बंद पडले आहेत. कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. गावाप्रमाणेच प्रत्येक शहरात आठवडी बाजार भरत असतो एका बाजारावर शंभर ते दीडशे विक्रेत अवलंबून असतात एका बाजारात लाखो रूपयांची उलाढाल होत असते त्यामुळे कोटयावधी रूपयांचा फटका सहन करावा लागला आहे, शेतकयाची अर्थव्यवस्था या बाजाराशी निगडीत असते बाजार बंद असल्याने मालाला त्या तुलनेत ग्राहक नाही. शेती मालाचेही मोठ नुकसान होत आहे.

* आठवडी बाजाराची ठिकाण

कल्याण : पिंपरी गावेली म्हारळ बेहेरे राया ओझर्ली
भिवंडी : चिंबीपाडा, कोन खारबाव पडघा पाच्छापूर अनगाव दाभाड वज्रेश्वरी अंबाडी अस्नोली
मुरबाड : सरळगाव धसई टोकावडे म्हसा
शहापूर : आटगाव किन्हवली सापगाव गोठेघर पिवळी मोखावणे कसारा, शेणवे अघई डोळखांब

भिस्त खासगी हॉस्पीटलवरच …. …

करोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने सरकारी हॉस्पीटलवरही ताण पडला आहे. मात्र हजारो कोटीचा बजेट असणा-या महापालिकांना इतक्या वर्षात एखाद सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारता आलेले नाही. त्यामुळे करोनाच्या लढयात वैद्यकिय यंत्रणेचा चांगलाच कस लागत असून, सगळी भिस्त ही खासगी हॉस्पीटलवरच अवलंबून आहे. कोव्हीड बाधितांवर चांगल्या पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा सामान्य रुग्णालय (२५० खाटा ), कौशल्या रुग्णालय (६० खाटा), होरायझॉन रुग्णालय( ६० बेडस ), वेदांत रुग्णालय (१०० बेडस ) काळसेकर रुग्णालय (१०० बेडस ), ठाणे हेल्थ केअर रुग्णालय (५३ बेडस ) व्यवस्था केली आहे. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने शास्त्रीनगर रूग्णालय (६२ बेडस ) बाज आर आर हॉस्पीटल (९२ बेडस ) निऑन हॉस्पीटल (६० बेडस ) तर हॉली क्रॉस (१५० बेडस) ची व्यवस्था केली आहे.

सार्वजनिक आरोग्य

रूग्णालये : १०
दवाखाने : ३
प्रसुतीगृह : १
प्राथमिक आरोग्य केंद्र : ३३
प्राथमिक उपकेंद्र : १८७
खाटांची संख्या : १३४३
डॉक्टर : २३४
परिचारीका : ६६०

मजूर, आदिवासींवर उपासमार

ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामानंतर शेतीला जोडधंदा म्हणून वीटभट्टीचा व्यवसाय करतात, ठाणे जिल्याहत कल्याण, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ मुरबाड आदी तालुक्यात दीड हजाराहून अधिक वीटभट्टी मालक आहेत. या वीट भट्टीत दहा हजार कामगार काम करतात. वीटभट्टया सुरू न झाल्याने त्यावर अवलंबून असणा-या हजारेा मजूर कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. किरणा मालाची दुकाने आणि औषध दुकाने या अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्वच दुकानांवर बंदी आहे, त्यामुळे जिल्हयातील व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणा-या कामगारांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकांनी भाजी आणि फळविक्रीचा व्यवसाय करण्यास सुरूवात केली आहे. तसेच खासगी वाहने रिक्षा या वाहतुकीवरही बंदी असल्याने हजारो वाहनचालकांच्याही पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मालवाहतूक वाहने : ३७१२११
प्रवासी वाहने : ३२२८९७२वीट भट्टी कामगार : १० हजार
रेल्वे मार्गाची लांबी : ५४५ किमी

शेतकरी चिंताग्रस्त …

ठाणे जिल्हयातील कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आणि ठाणे या तालुक्यात भात शेती लावली जाते. ठाणे जिल्हयात ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात भातपीक घेतले जाते. जिल्हयात भात नाचणी वरी व कडधान्य व भाजीपाला इत्यादी पिके पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. जून जूलै मध्ये पाऊस समाधानकारक झाल्याने पेरणी व लागवड वेळेवर झाली मात्र ऑक्टोबर नोव्हेंबरच्या अतिवृष्टीमुळे पीकाचे नुकसान झाले. पावसावरच इथली शेती अवलंबून असल्याने त्याचे नियोजन केले जात आहे मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढला तर मात्र त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हयातील शेतकरी चिंताग्रसत आहे.

खरीप क्षेत्र : ६५९०९ हेक्टर
सरासरी पर्जन्यमान २५१७ मिमी

मत्स्य व्यवसायाला फटका .

राज्याच्या ७२० किमी किना-यापैकी २७ किमी लांबीचा समुद्र किनारा ठाणे जिल्हयाला लाभला आहे. त्यामुळे जिल्हयात मोठया प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो. सागरी मासेमारी बरोबरच भूजल मासेमारी केली जाते. मत्स्य विक्रीसाठी मुंबईसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध असून आखाती देशांतूनही मत्स्य उत्पादनाला चांगली मागणी आहे. मागील वर्षात मासेमारीचे एकूण उत्पादन ३०६५१ मे टन झाले. मात्र लॉकडाऊनच्या काळात मत्स्यव्यवसायाला कोटयावधीचा फटका सहन करावा लागला आहे. मत्स्य व्यवसायाला सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे मात्र लॉकडाऊनमुळे मासळी मार्केट बंद आहेत त्यामुळे ग्राहक नसल्याने मत्स्यव्यवसायावर संकट कोसळलं आहे .

मासेमारीचे एकूण उत्पादन : ३०६५१ मे. टन
सागरी क्षेत्रातील उत्पादन : २८४४० मे टन
भूजल क्षेत्रातीील उत्पादन : २२११ मे टन

रोजगार धोक्यात …

जगभरात थैमान घातलेल्या करोनाविषाणूमुळे अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. लॉकडाऊनमुळे नोकरी उद्योग व्यवसाय सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ४५ दिवस झाले असताना अजून लॉकडाऊन किती काळ असेल याची शाश्वती नाही. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखेा चाकरमण्यांची जीवनवाहिनी असलेली रेल्वे वाहिनीला ब्रेक बसला आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा व्यवहार बंद पडले आहेत. ठाणे जिल्हयातील लाखो प्रवासी दररोज नोकरी उद्योग व्यवसायानिमित्त मुंबईत जातात. वास्तव्य ठाणे जिल्हयात आणि कामधंदा मुंबईत अशी लाखो नागरिकांची अवस्था आहे. तसेच जिल्हयात हातावर पोट असलेला सर्वसामान्य कष्टकरी वर्ग मोठया संख्येने आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रेाजगारावर गदी येण्याची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईवरचा ताण कमी करायचा असेल तर लगतच्या ठाणे जिल्हयात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -