घरमहाराष्ट्र...म्हणून त्यांना विश्वासघातकी बोललो, गद्दार नाहीच; उद्धव ठाकरेंचं एक पाऊल मागे

…म्हणून त्यांना विश्वासघातकी बोललो, गद्दार नाहीच; उद्धव ठाकरेंचं एक पाऊल मागे

Subscribe

शिवसेनेचं तुफान आहेच. लोकांच्या मनात, हृदयात आजही तुफान आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय

मुंबईः विश्वासघातकी बोललो ना त्यांना. गद्दार कुठे बोललो? म्हणून आज विश्वासघातकी शब्द वापरलाय. त्यांचा पण मान ठेवला मी. म्हणून त्यांना विश्वासघातकी बोललो, गद्दार नाही बोललो, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून हिणवलं जातंय, त्याच पार्श्वभूमीवर बंडखोरही आम्ही गद्दार नसल्याचं वारंवार सांगत आहेत.

तसेच उद्धव ठाकरेंनी बऱ्याचदा शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना गद्दार म्हटलं आहे, त्यानंतर बंडखोरांनी आम्हाला गद्दार म्हणू नका, अशी विनंती उद्धव ठाकरेंकडे केली होती. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे, त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना गद्दार नव्हे, विश्वासघातकी म्हटलं आहे. शिवसेनेचं तुफान या महाराष्ट्रात पुन्हा येईल का, असे संजय राऊतांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेचं तुफान आहेच. लोकांच्या मनात, हृदयात आजही तुफान आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय.

- Advertisement -

मला एवढंच सांगायचे आहे, की आपण माझे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानले, मात्र मी या जनतेचा ऋणी आहे. त्यांना मी इतकेच सांगेन की, मगाशी जो उल्लेख केला की ‘वर्षा’ सोडून ‘मातोश्री’वर निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळ्यात जे पाणी होते, त्या अश्रूंचे मोल मला आहे. त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लावल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही, गप्प बसू नका ही माझी जनताजनार्दनाकडे प्रार्थना आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

आजही हिंदुत्व सोडलेलं नाही

‘हेल्दी पॉलिटिक्स’ करावं. आम्ही तर मित्रच होतो. 25-30 वर्षे आपण त्यांचे सोबतीच होतो. तरीसुद्धा त्यांनी 2014 ला युती तोडली. कारण काहीही नव्हतं. तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाही. तेव्हासुद्धा भाजपने शिवसेनेशी युती शेवटच्या क्षणाला तोडली होती. त्यावेळी तर आम्ही मित्रच होतो त्यांचे 2019 ला. काय मागत होतो? मी अडीच वर्षांसाठी शिवसेनेकरिता मुख्यमंत्रिपद मागत होतो आणि द्यायचं ठरलं होतं. ते मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी नव्हतं. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद का मागितले होते? तर मी सरत्या काळामध्ये माननीय शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. मात्र तसं बघितलं तर माझं ते वचन अजूनही अर्धवटच आहे असे म्हणावे लागेल. कारण मी मुख्यमंत्री बनेन असे म्हणालो नव्हतो. मुख्यमंत्री पद मला एक आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. कारण सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपकडून त्या नाकारण्यात आल्या. म्हणून मला ते करावं लागलं, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

- Advertisement -

हेही वाचाः दिल्लीवाल्यांना मराठी माणसांकडून मराठी माणसांचीच डोकी फोडायची आहेत, ठाकरेंकडून केंद्र सरकारवर आसूड

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -