इव्हेंटबाजी बंद करून…, महासंकल्प कार्यक्रमावरून काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

इव्हेंटबाजी (Event) बंद करून रोजगार निर्माणाकडे लक्ष द्या, असा सल्ला काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला आहे.

sachin sawant and eknath shinde

मुंबई – राज्य सरकारतर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्राचा ‘महासंकल्प’ कार्यक्रमानिमित्त जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि मृद व जलसंधारण विभागातील 1032 अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावरून आता प्रचंड टीका केली जातेय. इव्हेंटबाजी (Event) बंद करून रोजगार निर्माणाकडे लक्ष द्या, असा सल्ला काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला आहे.

स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यासाठी काल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरून स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य या ट्विटर हॅण्डलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. “नोकरभरतीबद्दल मार्केटिंग सध्या राज्यात जोरात सुरू आहे. आज अभियंत्यांना नियुक्तीपत्रे वाटप करणार आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इतकाच रिकामा वेळ असेल तर यापुढे चपराशी, चौकीदार, कोर्ट हमाल असे इतर सर्व पदांचे नियुक्तीपत्रे वाटपाचा कार्यक्रम प्रत्येक आठवड्यात आयोजित करावा,” असं ट्वीट केले आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1032 अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान, 111 उमेदवारांनाही दिली ग्वाही

याच ट्विटला रिट्विट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “बेरोजगारी वाढत असताना उद्योग महाराष्ट्रातून जात असल्याने पत सांभाळण्यासाठी लोकसेवा आयोगाच्या प्रतिवर्षी होणाऱ्या भरत्यांचेही इव्हेंट करत आहेत. आज १११ भरत्यांना स्थगितीही मिळाली. अशाने गेलेली पत परत मिळणार नाही. त्यापेक्षा इव्हेंटबाजी बंद करा व रोजगार निर्माण करण्याकडे लक्ष द्या,” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकारने १० लाख रोजगार निर्मितीचा संकल्प केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात वर्षभरात ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यानुसार, विविध विभागातील पदांच्या नियुक्तीचे नियुक्तीपत्रे राज्य सरकारकडून कार्यक्रमात देण्यात येत आहे. मात्र, नियुक्तीपत्रासाठी कार्यक्रम घेण्याची का गरज असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येतोय. आम्हीही आमच्या काळात अनेक भरत्या केल्या, पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कधी नियुक्तीपत्रे वाटली नव्हती, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही काही दिवसांपूर्वी केली होती.