घरमहाराष्ट्रपालक,विद्यार्थ्यांचे ‘दिवाळीपर्यंत स्कूल फ्रॉम होम’

पालक,विद्यार्थ्यांचे ‘दिवाळीपर्यंत स्कूल फ्रॉम होम’

Subscribe

कोरोनावरील लस येईपर्यंत शाळा सुरू करण्यास पालकांचा विरोध,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे सप्टेंबरपासून केंद्र सरकार शाळा सुरू करण्याचा विचार करत असून, त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. मात्र राज्यातील पालकांनी सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या सुरू असलेले ‘स्कूल फ्रॉम होम’ योग्य असून, दिवाळीनंतर किंवा बाजारात लस आल्यानंतरच शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी भूमिका पालक आणि विद्यार्थ्यांनी ‘आपलं महानगर’कडे व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशामध्ये शिशू वर्गापासून पदवीपर्यंतचे शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. आता केंद्र सरकारकडून सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याची तयारी केली जात आहे. मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडे सोपवला आहे. केंद्र सरकारकडून शाळा सुरू करण्याची तयारी करण्यात येत असली तरी पालकांकडून मात्र सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्याबरोबरच मुलांनाही दिवाळीपूर्वी मुलांना शाळेत पाठवण्यास विरोध करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवल्यास त्यांना संसर्ग झाल्यास त्याची जबाबदारी सरकार किंवा शाळा घेणार आहे का? असा प्रतिप्रश्न पालकांकडून विचारण्यात येत आहे. शाळा सुरू झाल्या पाहिजेत; पण कोरोनावर लस आल्यानंतरच अशी भूमिकाही काही पालकांनी मांडली. सोशल डिस्टन्सिंग राखत शाळेत विद्यार्थ्यांना बसवणार असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

परंतु वर्गाचा पट लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग राखत मुलांना वर्गामध्ये बसवणे शक्य आहे का? मुले एकत्र आल्यावर सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल का? शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता राखण्यात येणार आहे का? वॉशरूम, वर्गामध्ये सॅनिटायझरची व्यवस्था शाळांकडून करण्यात येणार आहे का? मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असताना त्यांना स्वच्छतेचे धडे कसे देता येतील. नववी, दहावीचे विद्यार्थी एखादेवेळी सूचनाचे पालन करू शकतील; पण शिशू ते चौथीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना कसे सांभाळणार, लहान मुले फार वेळ मास्क तोंडावर बांधून राहत नाहीत. त्यांची काळजी कशी घेणार असे अनेक प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात आले. मुलांची काळजी घेण्याबाबत कोणत्याही उपाययोजनेची माहिती सरकारकडून दिली जात नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये मुलांना शाळेत पाठवण्यास पालकांनी ठाम विरोध केला आहे. दिवाळीनंतरच आम्ही मुलांना शाळेत पाठवू, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. तर काही पालकांनी दिवाळीच नव्हे तर कोरोनावर लस आल्याशिवाय आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे सांगितले. काही पालकांनी सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन वर्गामुळे आमची मुले सुरक्षित आहेत, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत ऑनलाईन वर्गच घेण्यात यावेत, असे सांगितले.

अन्यथा शाळा शुल्कासाठी वेठीस धरतील
ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास समजण्यात अडचणी येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना किती समजले याची पडताळणीही शिक्षकांकडून होत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाबाबत साशंकता असली तरी लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या ऑनलाईन वर्गच सुरू ठेवावेत, अन्यथा शुल्कासाठी शाळांकडून वेठीस धरण्यात येईल, अशी भीतीही पालकांकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

लस आल्याशिवाय मुलांना शाळेत पाठवणार नाही, असे अनेक पालकांचे म्हणणे आहे. परंतु ते शक्य नसून, यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करणे योग्य ठरणार नाही. शाळा प्रशासनाला तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा. तसेच शाळा सुरू करण्यासंदर्भात सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करूनच शाळा सुरू कराव्यात. शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाची तयारी असल्यास पालकही मुलांना शाळेत पाठवण्यासाठी सकारात्मकता दर्शवतील. त्यामुळे सप्टेंबरऐवजी दिवाळीनंतरच शाळा सुरू करण्यात याव्यात.
– अरुंधती चव्हाण, अध्यक्ष, पॅरेंट अ‍ॅण्ड टीचर्स असोसिएशन

राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या
पहिली ते पाचवी – 99,21,352
सहावी ते आठवी – 58,26,700
आठवी ते दहावी – 37,23,213
एकूण – 1,94,71,265

केनियामध्ये शाळा बंद, ऑनलाईन शिक्षण सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षता घेता केनियाने 2020 मध्ये शाळा पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याऐवजी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याचे आदेश केनियाच्या सरकारने दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेता मार्चमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमेरिकेत 97 हजार विद्यार्थी कोरोनाग्रस्त
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अमेरिकेमध्ये जुलैमध्ये शाळा व कॉलेज सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र त्याची मोठी किंमत सरकारला चुकवावी लागली. अवघ्या दोन आठवड्यात अमेरिकेतील 97 हजार विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. अमेरिकन अ‍ॅकेडमिक पेडियाट्रिक्सने दिलेल्या अहवालानुसार 15 ते 30 जुलैदरम्यान अमेरिकेत शाळा सुरू झाल्यावर ही संख्या वाढली. अमेरिकेतील 50 लाख कोरोनाग्रस्तांमध्ये 3 लाख 38 हजार मुलांची संख्या होती. यामध्ये शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांची संख्या 97 हजार होती, असे व्हँडरबिल्ट विद्यापीठाच्या डॉ. टीना हार्टर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टन्सिंग राखले जात नसल्याने हा आकडा वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात केंद्राने कोणताही निर्णय घेतला नाही. शाळा सुरू करण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या अखत्यारित येत आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण अधिक सुलभ करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत.
– विनय सहस्त्रबुद्धे, अध्यक्ष, मनुष्यबळ विकास समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -