घरमहाराष्ट्रअकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशास मुदतवाढ

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशास मुदतवाढ

Subscribe

दैनंदिन गुणवत्ता फेरी ३० सप्टेंबरला संपल्यानंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने शिक्षण संचालकांकडून दैनंदिन गुणवत्ता फेरीला १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई विभागात आतापर्यंत विविध महाविद्यालयांमध्ये २ लाख ७१ हजार ३०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अद्यापही १ लाखापेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत.

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. तीन नियमित व तीन विशेष प्रवेश फेर्‍यांनंतर अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी २७ ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यात आली. या दैनंदिन फेरीमध्ये ४ दिवसांमध्ये ७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, मात्र पोर्टलवर केलेल्या नोंदणीनुसार अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे दिसून येत असल्याने दैनंदिन गुणवत्ता फेरी १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.

- Advertisement -

दैनंदिन गुणवत्ता फेरीला मुदतवाढ देताना शिक्षण संचालकांकडून काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना सायंकाळी ७ ते सकाळी ९ वाजेदरम्यान ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यानंतर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान प्रवेश घेता येणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा पुढील दिवसाच्या फेरीसाठी आपोआप विचार केला जाईल. प्रवेशासाठी निवड होऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयासाठी पूर्ण फेरीदरम्यान प्रतिबंधित केले जाईल. प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांनादेखील त्या महाविद्यालयासाठी प्रतिबंधित केले जाईल. यापुढे प्रवेश रद्द करण्याची परवानगी असणार नाही. नवीन विद्यार्थी नोंदणी, नवीन अर्ज भाग एक भरणे आणि त्यामध्ये बदल करण्यासाठी अर्ज अनलॉक करणे ४ ऑक्टोबरपासून बंद होईल.

अर्ज पडताळणी फक्त शिक्षण उपसंचालक लॉगिनवरूनच केली जाऊ शकेल. ३ ऑक्टोबरपासून मार्गदर्शन केंद्र लॉगिन बंद होतील. कोणताही नवीन अर्ज आपोआप प्रमाणित होणार नाही. प्रत्येक नवीन नोंदणी शिक्षण उपसंचालकांनी तपासणी केल्यानंतरच पूर्ण होईल. ही फेरी १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. सुट्टीचे दिवस केवळ अर्ज करण्यासाठी वापरले जातील. कोटा आणि द्विलक्षी प्रवेश प्रक्रियादेखील नेहमीप्रमाणे सुरू असतील. दुबार प्रवेश घेणारे अथवा जाणीवपूर्वक जागा अडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत कडक कारवाई केली जाईल, असेदेखील उपसंचालक कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -