सुन्न… मातांचा आक्रोश भंडारा जिल्हा रुग्णालय आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू

Bhandara Hospital Fire

भंडार्‍यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही आग लागली. शिशु केअर युनिटला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने ही घटना घडली. या शिशु केअर युनिटमध्ये १७ बालके होती. यापैकी ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

भंडार्‍यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकार्‍यांना सांगितले. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. अतिदक्षता विभागात आऊटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बाळांच्या आईंचा आक्रोश

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या आई किंवा अन्य नातेवाईकांना त्यांच्या बाळाला पाहू दिलेले नाही. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच बाळांच्या आई आणि नातेवाईक आक्रोश करत असल्याचे अत्यंत दु:खद चित्र भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर दिसत होते.

पाच लाखांची मदत आणि चौकशीचे आदेश

भंडार्‍यातील जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दोषींवर कारवाई व्हावी- फडणवीस

ही घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

भंडारा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. भंडार्‍यातील दुर्घटना हृदय पिळवटणारी आहे. आपण मौल्यवान जीव गमावले आहेत. पीडितांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत. दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

चौकशी समिती नियुक्त

या घटनेची चौकशी करण्यासाठी सहा जणांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती या घटनेची सखोल चौकशी करणार असून तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या घटनेचा प्राथमिक अहवाल रविवारी अपेक्षित आहे.