घरमहाराष्ट्रठाकरे गटाचे आज शक्तिप्रदर्शन, मुंबई महापालिकेवर मोर्चा

ठाकरे गटाचे आज शक्तिप्रदर्शन, मुंबई महापालिकेवर मोर्चा

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप करत या घोटाळ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा आज मुंबई महापालिकेवर धडकणार आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून त्याद्वारे शिंदे गट आणि भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न होणार आहे.

मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या मात्र आता मुदत संपल्याने सत्ता हातातून गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून युवानेते, माजी मंत्री व विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. गेल्यावर्षी राज्यातील सत्तेतून पायउतार झाल्यानंतर ठाकरे गट स्वतंत्रपणे आज प्रथमच रस्त्यावर उतरणार असून या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

कॅगने ठपका ठेवलेल्या मुंबई महापालिकेतील कथित 12 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी समितीद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची कोंडी करण्याची शिंदे गटाची रणनीती आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण, स्ट्रीट फर्निचर आणि खडी कामात घोटाळा झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी करत 1 जुलै 2023 रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, खासदार, आमदार, माजी नगरसेवक सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी राजकीय स्वप्न असलेल्या मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी व आयुक्त चहल यांनी सत्तेचा गैरवापर करून मुंबईत जी काही रस्ते, सुशोभीकरण, जी – 20 आदी कामे हाती घेतली व केली त्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप युवानेते आदित्य ठाकरे यांनी नुकताच केला आहे.

- Advertisement -

ठाकरे गटाचा मोर्चा आज दुपारी तीन वाजता मेट्रो सिनेमा येथून निघेल. हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या दिशेने धडकल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संबोधित करतील. मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. मोर्चाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी ठाकरे गटाने मुंबईत बॅनरबाजी केली आहे. याशिवाय समाज माध्यमांत जोरदार प्रचार केला आहे.

हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा काढण्यात येणार असून या मोर्चात सर्वसामान्य नागरिकांना सामावून घेताना ठाकरे गटाने मुंबईतील सर्व विभागप्रमुख, विधानसभा समन्वयक, शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मोर्चात सहभागी होण्याच्या सूचना केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -