१०० चोरीचे आणि गहाळ मोबाईल जप्त; ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गेल्या काही दिवसात चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल १०० मोबाईल फोन जप्त करण्याबरोबरच दोन गुन्हे उघडकीस आणण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश आले आहे. तसेच याप्रकरणी दोघांना अटक केली असून हे मोबाईल सामान्य लोकांना विक्री करून वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.

काही दिवसामध्ये ठाणे शहरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोबाईल जबरी चोरी पथक स्थापन केले. या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आणि अत्यंत कौशल्याने तपास करून त्या मोबाईल फोनचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. याचदरम्यान या पथकाने वेगवेगळ्या कंपनीचे १०० मोबाईल आणि ०२ गुन्हे उघडकीस आणताना दोघांना बेड्या घातल्या.

तसेच त्या दोघांना संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग केले. त्याचबरोबर आणखी काही मोबाईलचा अजूनही शोध घेतला जात आहे. तसेच जप्त केलेले मोबाईल हे सामान्य लोकांना विक्री करून वापरत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कामगिरी पोलीस उप निरीक्षक महेश जाधव, पोलीस अंमलदार राजेंद्र काठोळे, अनिल पाटील, शशिकांत भदाणे, नामदेव मुंडे, रोशन जाधव, सागर सुरळकर, हुसेन तडवी या पथकाने केली.

मोबाईल घेताना चौकशी करून घ्यावी- पोलिसांचे आवाहन

मोबाईल चोरी झाला असल्यास तात्काळ जवळील पोलीस ठाण्यांशी संपर्क करावा. तसेच प्रवासात अथवा रस्त्याने मोबाईल चोरी जाणार नाही अथवा गहाळ होणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच कोणी कमी किमतीमध्ये मोबाईल विक्री करत असल्यास त्याची शहानिशा करून खरेदी करावे अन्यथा पोलीस स्टेशनशी संपर्क करावा.


हेही वाचा : शिवसेना-राष्ट्रवादीशिवाय गोव्यात सरकार बनणार नाही, संजय राऊतांचा विश्वास