चांदणी चौकातील पूल अखेर इतिहासजमा, ढिगारा हटवण्याचं काम सुरू

chandani chauk

पुणे – पुण्यातील तीस वर्षे जुना चांदणी चौकातील पूल अखेर मध्यरात्री पाडण्यात आला. मध्यरात्री एक वाजता स्फोट घडवून हा पूल पाडण्यात आला असून येथे मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. प्रशासनाकडून आता हा ढिगारा बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रात्री एक वाजता काऊंटडाऊन करून मोठ्या प्रमाणात स्फोट घडवण्यात आला. पुलाचे दगडी आणि सिमेंटचे बांधकाम स्फोटकांमुळे कोसळले असून या पुलाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेले पोलादी स्ट्रक्चर तसंच आहेत. ज्या-ज्या ठिकाणी स्फोटके पेरण्यात आले होते, तिथे सर्व ठिकाणी स्फोट झाला नसावा अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कसा पाडला पूल

हा पूल पाडण्यात येणार असल्याची बातमी गेल्या आठवडाभर चर्चेत होता. त्यामुळे पूल कसा पाडणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. पूल पाडण्याआधी त्यावर पांढरा कापड टाकण्यात आला होता. स्फोटानंतर परिसरात धुरळा उडू नये याकरता ही खबरदारी घेण्यात आली. पुलाच्या स्ट्रक्चरला 1300 छिद्र पाडून त्यात 600 किलो स्फोटक भरण्यात आली होती. रात्री बारा वाजेनंतर हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. या परिसरात फार रहिवासी इमारती नाहीत. आजूबाजूला असलेली हॉटेल्स मात्र रिकामी करण्यात आली होती. २०० मीटरपर्यंत परिसर निर्मनुष्य करण्यात आला. आपत्कालीन घटनेसाठी वैद्यकीय सुविधाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. रात्री १ च्या दरम्यान उलट्या पद्धतीने काऊंटडाऊन सुरू करून बरोबर एकच्या ठोक्याला स्फोट घडवण्यात आला. हा पूल अद्यापही पूर्णपणे कोसळला नसल्याचं सांगण्यात येतंय.