घरमहाराष्ट्रमुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

Subscribe

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका तरुणीला राजस्थान येथे नेऊन विकल्याची घटना अमरावती शहरात उघडकीस आली आहे. सदर युवतीची अमरावती पोलिसांनी सुटका केली असून तिची विक्री करणाऱ्या ७ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अजूनही काही आरोपी निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणीची अकोला येथील माया नामक महिलेसोबत फेसबुकवर मैत्री झाली. काही दिवसांपूर्वीच मायाने सदर युवतीला खरेदीच्या निमित्ताने सुरत येथे जाण्यासाठी बोलाविले. मात्र सुरतला न जाता त्या दोघी राजस्थानमध्ये गेल्या. तिथे मायाने कैलास अग्रवाल नामक व्यक्तीशी संपर्क केला व त्याच्या मध्यस्थीने प्रवीण सोनी या युवकाला दीड लाख रुपयांमध्ये युवतीची विक्री करण्यात आली. त्यानंतर प्रवीणने युवतीशी जबरीने विवाह केला. दरम्यान संधी मिळताच तरुणीने अमरावती येथील आपल्या भावाशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली.


वाचा: सावधान! दिल्लीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

फ्रेझरपुरा पोलीस व सायबर सेलच्या मदतीने संबंधित तरुणीला राजस्थान येथून सुखरूप परत आणले. मात्र यावेळी आरोपी तेथून फरार झाले होते. दीड लाख रुपये देऊनही युवती हातातून निसटली, याचे शल्य मनात ठेवून सात आरोपी पुन्हा युवतीच्या घरी आले. त्या युवतीने आपल्या सोबत यावे, अन्यथा पैसे द्यावे, असा आरोपींचा बेत होता; मात्र पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोचून सातही आरोपीना ताब्यात घेतले. कैलास अग्रवाल, प्रवीण सोनी, शांतीलाल सोनी, वाहन चालक जगदीश मोंग्या, निकेशकुमार रावल, कुलदीप तांबे, शैलेश राऊत यांना पोलिसांनी अटक केली तर आरोपींचे टवेरा वाहनही ताब्यात घेतले आहे. आरोपीना न्यायालयाने १७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आतापर्यंतच्या तपासात अकोला येथील अजून सहा आरोपींची नावं समोर आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे सर्व आरोपी गरीब व गरजू मुलींच्या विक्रीचे रॅकेट चालवीत असल्याचं निष्पन्न झालं असून अमरावती पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -