दोन दिवसात बैठक घेऊ तोपर्यंत मोर्चा स्थगित करण्याची सरकारची मागणी अमान्य करत मोर्चा सुरूच

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून लाल वादळ अर्थात कम्युनिस्ट पार्टी, किसान सभा या डाव्या विचारांच्या संघटनांच्या नेतृत्वात शेतकरी, कामगार व आदिवासी बांधवांचा पायी मोर्चा रविवारी (दी.१२) दिंडोरी येथून सुरू झाला. दरम्यान, सायंकाळी या मोर्चाचे नाशिक शहरात आगमन झालयानंतर पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी मोर्चाचे नेतृत्व करत असलेले माजी आमदार जिवा पांडू गावीत तसेच अजित नवले आणि इतर काही नेत्यासोबत रात्री ८ वाजता बैठक घेतली. ही बैठक रात्री ११:३० वाजेपर्यंत सुरू होती. तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीनंतरही कोणताच ठोस तोडगा न निघाल्याने अखेर पुन्हा मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी मोर्चेकऱ्यांच्या सर्व मागण्या समजून घेतल्या. याबाबत २ दिवसात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बोलून बैठक घेऊ, त्या त्या खात्यांचे सचिव तसेच प्रमुख अधिकारी यांनाही त्यात सामील करून घेऊ तोपर्यंत आपण मोर्चा स्थगित करावा अशी विनंती केली. मात्र, बैठकींना आम्ही येऊ मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मोर्चा पुढे मार्गक्रमण करतच राहील असा निर्धार माजी आमदार जिवा पांडू गावीत यांनी व्यक्त केला आहे.

२०१८चा कटू अनुभव 

खरतर, पाच वर्षापूर्वी देखील या शेतकरी, कामगार व आदिवासी बांधवांनी पायी थेट मंत्रालय गाठले होते. त्यावेळी देखील याच मागण्या घेऊन त्यांनी लोंग मार्च काढला होता. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांना ठोस आश्वासन दिल्यानंतर मोर्चा माघारी फिरला होता. मात्र, त्यानंतर त्यांच्या मागण्यांवर कोणतीच कारवाई न झाल्याने तो अत्यंत वाईट अनुभव होता अशी खंत माजी आमदार जिवा पांडू गावीत यांनी व्यक्त केली.