मंत्रालय बंद पण दुकानदारी सुरु आहे; पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Pankaja Munde

भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं. राज्यात योजना बंद होत आहेत, पण भ्रष्टाचार मात्र जोरात सुरु आहे. मंत्रालय बंद राहत आहे, दुकानदारी मात्र जोरात चालू आहे, अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. मंत्रालयातील प्रमुख पदांपैकी मुख्यमंत्री पद महत्त्वाचं आहे, त्यानंतर गृहमंत्रीपद महत्त्वाचं आहे. पण या राज्यामधले मंत्री स्वत:च भ्रष्टाचार आणि व्यभिचार यामध्ये बरबटलेले असतील, यांचं वर्तन चांगलं नसेल जनतेने कोणाकडून अपेक्षा करायच्या? असा सवाल करत या सरकारकडून लोकांना अपेक्षा राहिलेल्या नाहीत, येणाऱ्या सरकारमध्ये लोक यांना इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तीन तिघाडं काम बिघाडं सरकार आहे. सरकारमध्ये विसंवाद आहे. महागाईवर मोर्चा काढत आहेत. केंद्राने इंधनावर ५ रुपयांची कपात केली, त्यानंतर २५ राज्यांनी इंधनावरील वॅट कमी केला. महाराष्ट्र सरकारने तो निर्णय अद्याप घेतला नाही. यांच्या महागाईच्या मोर्च्याला अर्थ काय? जे काही द्यायचं आहे ते केंद्राच्या खिशातून द्या. आमच्या राज्याच्या खिशातले जे काही पैसे आहेत ते भ्रष्ट मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या खिशात जाण्यासाठी आहेत की काय, असा सवाल सामान्य माणूस विचारेल, असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला.

या सरकारने वैधानिक महामंडळे बंद करुन टाकली आहेत. ज्या योजना आमच्या सरकारने आणल्या होत्या त्या सर्व या सरकारने बंद केल्या. वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार, थेट संरपंच निवडणूक, ऑनलाईन शिक्षण बदल्या हे निर्णय रद्द केले. राज्यात योजना बंद होत आहेत, पण भ्रष्टाचार मात्र जोरात सुरु आहे. मंत्रालय बंद राहत आहे, दुकानदारी मात्र जोरात चालू आहे, अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.