घरमहाराष्ट्रआमदार नेले, उद्योग नेले, आता मंत्री गुजरातला गेले; मंत्रिमंडळ बैठक रद्द केल्याने...

आमदार नेले, उद्योग नेले, आता मंत्री गुजरातला गेले; मंत्रिमंडळ बैठक रद्द केल्याने आदित्य ठाकरेंचा टोला

Subscribe

मुंबई – आज होणारी मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आधी आमदार नेले, मग उद्योग नेले आणि मंत्रिमंडळ घेऊन गेले आहेत, असा उपरोधिक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज्यात ओला दुष्काळ आहे. बेरोजगारी वाढत आहे, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा आहे, असं असताना मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. आपलं मंत्रिमंडळ गुजरातमध्ये व्यस्त आहे. राज्यातील प्रश्नांबाबत मंत्रिमंडळ बैठक गरजेची आहे. ओला दुष्काळाचे निकष बदलण्यासाठी समितीची गरज असते. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राज्यातील प्रश्नांसाठी एक तासही नाही. पण आपलं राज्य सोडून इतर ते राज्यात व्यस्त आहेत. मंत्री प्रचारासाठी गुजरातला गेलेत याचं दुःख नाही. पण महाराष्ट्रातही मंत्रीमंडळ बैठक व्हायला हवी, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आधी आमदार गुजरातला नेले. मग उद्योग घेऊन गेले. आता मंत्री गुजरातला गेले आहेत, असा उपरोधिक टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.

आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर

दरम्यान, आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. ‘मी बिहार दौऱ्यावर पाटणा येथे जाणार आहे. तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहे. आम्ही दोघेही एकाच वयाचे आहोत. त्यांचंही काम चांगलं सुरू आहे. पर्यावरणासह इतर विषयांवर चर्चा होऊ शकेल,’ अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

चिखलात पडायचं नाही

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयने आज मोठा खुलासा केला आहे. दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असा दावा सीबीआने केला आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात भाजपा नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयत्न केला होता. आता, दिशा सालियनच्या मृत्यूचा निष्कर्ष समोर आल्याने आदित्य ठाकरेंना याबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी नितेश राणेंनी केलेल्या कोणत्याही आरोपावर प्रत्युत्तर दिलं नाही. ‘घाणेरड्या राजकारणात मी जाऊ इच्छितच नाहीत. या चिखलात मला पडायचं नाही,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी जाहीर केली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -