घरमहाराष्ट्रभटक्या मुलांना मिळाले शिक्षणाचे धडे!

भटक्या मुलांना मिळाले शिक्षणाचे धडे!

Subscribe

टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार शोधत भटकंती करणार्‍या आदिवासींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम तालुक्यात होत आहे. त्यामुळे या भटकणार्‍या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार्‍या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत आहे.

आधुनिकतेचे तुणतुणे वाजविले जात असले तरी महाड, पोलादपूर तालुक्यातील आदिवासी समाज अठरा विश्व दारिद्य्राच्या गर्तेत आजही असल्याने कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कर्त्या पुरुषांसह महिलांना वाळू उपसा, वीटभट्टी, बांधकाम आदी ठिकाणी मोलमजुरी करावी लागत आहे. पावसाळा संपल्यानंतर जेथे हाताला काम मिळेल तेथे पाच ते दहा कुटुंबे जात असतात. ज्यांच्याबरोबर त्यांची मुलेही असतात. पोलादपूर ते कुडपण या जिल्हा ग्रामीण मार्गावर गोळेगणी फाट्याजवळील नदीच्या पात्रावर पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. या कामावर महाड तालुक्यातील कोतुर्डे गावातील २० आदिवासी कुटुंबे स्थलांतर करून मजूर म्हणून काम करत आहेत.

- Advertisement -

मागील दोन महिन्यांपासून पुलाचे काम सुरू असताना मजुरांची मुले नदी काठावर भटकत, खेळत असताना याच दरम्यान गोळेगणी शाळेला भेट देण्यासाठी जाणार्‍या केंद्रप्रमुख विजय जाधव यांच्या नजरेस ही मुले पडली आणि त्यांच्यातील हाडाचा शिक्षक जागा झाला. ते त्या मुलांजवळ गेले आणि विचारपूस केली. त्यांना थोरामोठ्यांच्या गोष्ठी सांगत त्यांना आपलेसे केले. त्यांच्या पालकांची भेट घेऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि कामापासून जवळच असलेल्या पिंपळवाडी प्राथमिक शाळेत दाखल करून घेतले, शिक्षकही त्यांना प्रेमाने शिकवत असतात. या मुलांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. आता ही मुले शिक्षणात चांगलीच रमली असून, जाधव आणि त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक होत आहे.

आदिवासी कुटुंबे स्थलांतरित झाल्यानंतर त्या परिसरातील शाळेत प्रवेशासाठी मुख्याध्यापकांकडून पालकांना पत्र दिले जाते. मात्र काही कुटुंबे ज्या ठिकाणी काम करीत असतात तेथून शाळा दूर असल्याने ही मुले शिक्षणाला पारखी होतात हे वास्तव आहे.
-सुभाष साळुंखे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी, पोलादपूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -