घरमहाराष्ट्रमहागड्या सायकली चोरण्यात अल्पवयीन मुलाचा ‘विक्रम’

महागड्या सायकली चोरण्यात अल्पवयीन मुलाचा ‘विक्रम’

Subscribe

तालुक्यातील उकरूळ परिसरातील एका अल्पवयीन मुलाने सायकल चोरण्याचा विक्रम केला आहे. नेरळ पोलिसांनी हा प्रकार उजेडात आणला आहे. नेरळ, कर्जत, बदलापूर भागातून या अल्पवयीन मुलाने 20 सायकली चोरून काही सायकली उकरूळ, तर काही सायकली नेरळ परिसरात ठेवल्या होत्या. त्याच्याकडून 18 सायकली ताब्यात घेण्यात आल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 एप्रिल रोजी नेरळच्या राजेंद्रगुरूनगरमधील संतोष गोविंद शिंगाडे यांनी आपल्या लहान मुलाची 9 हजार रुपये किमतीची सायकल कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात दिली होती. अशा अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, शिपाई वैभव बारगजे, नाईक नीलेश निकम, शिपाई अमोल पाटील, होमगार्ड राहुल पाटील यांचे पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.

- Advertisement -

त्यानुसार सीसीटीव्हीच्या माध्यमातून, तसेच अनेक मार्गाने तपास करीत सायकल चोरणारा उकरूळ येथील अल्पवयीन असल्याचा तपास पोलिसांनी लावला व त्याला पोलीस ठाण्यात हजर केले. त्यावेळी त्याने नेरळ, बदलापूर, कर्जत परिसरातून या सायकली चोरल्या असल्याचे कबूल केले. चोरून आणलेल्या तब्बल 5 ते 10 हजारापर्यंत अशा 18 सायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. यातील 5 सायकल मालकांचा शोध लागला आहे.

बाकीच्या सायकली कोणाच्या आहेत हे कळलेले नाही. कोणाची सायकल हरवली असल्यास नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -