ते होते दरोडा टाकण्याच्या तयारीत; मात्र, पोलिसांनी ते हेरल आणि…

संगमनेर : खुर्द शिवारात दरोडाच्या तयारीत असलेली टोळी पकडण्यात पोलीस उपअधीक्षक आणि शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. टोळीतील चौघांना पोलिसांनी घातक शस्त्रास्त्रासह पकडले तर त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई शुक्रवार(१०) मार्च रोजी पहाटे केली आहे.तर पोलिसांनी चौघाजणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलीस उपाधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या आदेशावरून दोन दिवसांपूर्वीच्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल, पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर, अण्णासाहेब दातीर शहर पोलीस ठाण्याचे वाहनचालक अजय आठरे, अमृत आढाव, सुभाष बोडखे होमगार्ड थोरात यांचे पथक हिवरगाव पावसा येथे जात असताना २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर खुर्द गावच्या शिवारात सूर्या बारपासून काही अंतरावर बिना क्रमांकाची एक स्विफ्ट कार संशयास्पदरित्या उभी होती. पथकातील कर्मचारी कारजवळ जात असताना कारबाहेर उभा असलेला एक जण पोलिसांना पाहून जवळच्या शेतात पळून गेला. त्यामुळे पोलीस पथकाने स्विफ्ट कारची तपासणी सुरू केली असता त्यामध्ये चौघेजण संशयास्पद स्थितीत बसलेले असल्याचे त्यांना आढळून आले.

पथकाने त्यांना बाहेर येण्यास सांगितले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पथकाने त्यांना लगेचच पकडले. पकडलेल्या चौघांकडे पथकाने चौकशी केली असता त्यांनी उत्तरे दिल्याने पोलीस अधिकारी पटेल यांनी लगेचच पंचांच्या मदतीने गाडीची तपासणी केली असता या सर्वांची टोळी दरोडाच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. कारच्या तपासणीअंती पोलिसांना कुर्‍हाड, सत्तुर, चार करवती, कागदामध्ये बांधलेली मिरची पावडर, नायलॉन दोरी, लोखंडी गज, कानस असे दरोड्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आढळून आले. तसेच वापरलेली कार (एम.एच. 02 सी.डी. 8148) देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

महेंद्र लक्ष्मण मधे (वय 25 रा. अभंग वस्ती, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), अविनाश चंद्रकांत जाधव वय 26 वर्ष, प्रवीण चंद्रकांत जाधव वय 24 वर्ष (दोघे रा. शिरोली (बोरी) डावखर मळा, ता. जुन्नर जि. पुणे आणि रोहन रामदास गिर्‍हे (वय 20 वर्ष हल्ली रा. खोडद, तालुका जुन्नर, जि. पुणे, मूळ रा. शिदोंडी ता. संगमनेर जि. अहमदनगर) या चौघांना अटक केली असून त्यांचा पाचवा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) असे पाचव्या आरोपीचे नाव आरोपींनी सांगितले असल्याची माहिती मिळाली.याप्रकरणी पोलिस कॉन्सटेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १८८/ २०२३ भादवि कलम ३९९,४०२,आर्म अ‍ॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.