घरमहाराष्ट्र'इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत'; 'रिव्हर अँथम' केवळ करमणुक

‘इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत’; ‘रिव्हर अँथम’ केवळ करमणुक

Subscribe

इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘रिव्हर अँथम’च्या नावाखाली करमणुक करण्यापेक्षा नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी एखादा ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, असा सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.

आषाढी वारीच्या तोंडावर देहू नगरीतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘रिव्हर अँथम’च्या नावाखाली गाणी गाण्यापेक्षा नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी एखादा ठोस कार्यक्रम हाती घेतला असता तर ही घटना झाली नसती, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच रिव्हर अँथमहा केवळ करमणुकीचा भाग असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

रिव्हर अँथममुळे कोणत्या नद्या प्रदुषणमुक्त झाल्या?

आषाढीवारी निमित्त लाखो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करत असतात. मात्र, नदीत मैलायुक्त सांडपाणी आणि रासायनिक पाणी सोडले जात असल्यामुळेच या नदीचे पावित्र्यच धोक्यात आले आहे. अशा प्रदुषित पाण्यात वारकऱ्यांनी स्नान कसे करायचे, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे. ‘रिव्हर अँथम’च्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांना संगिताच्या तालावर ठेका धरायला लावला. यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री कार्यालयाने नद्यांसंदर्भात अनेक स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेऊन रिव्हर ऍथॉरिटी स्थापन करू, असे म्हटले होते. त्याचे काय झाले? नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काही उपयोग झालेला तर दिसत नाही, म्हणजे रिव्हर अँथम हा केवळ करमणुकीचा भाग होता का?, असा सवाल सावंत यांनी विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी इव्हेंट आणि स्टंट करण्यापेक्षा नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा. तसे केले नसल्यामुळेच इंद्रायणीसारख्या नद्यांचे पावित्र्य आता धोक्यात आले आहे. अजूनही वेळ गेलेली नसून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी कार्यक्रम हाती घ्यावा आणि प्रदुषणाच्या विळख्यातून नद्यांची सुटका करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अल्बममध्ये नाचणार्‍यांनी मला शिकवू नये


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -