घरमहाराष्ट्रपारंपरिक कुंभार काम व्यवसायाला घरघर!

पारंपरिक कुंभार काम व्यवसायाला घरघर!

Subscribe

उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आणि घशाला कोरड पडली की, डोळ्यासमोर येतो तो मातीचा माठ. असे असले तरी आता हे मातीचे माठ बनविणारे पारंपरिक कारागीर फारच कमी राहिले आहेत. या कलेत केवळ जुनीच पिढी शिल्लक राहिली आहे. नवीन पिढी शिक्षण घेऊन नोकरीला पसंती देत आहेत. परिणामी उत्कृष्ट कलेचा नमुना समजल्या जाणार्‍या कुंभार कामाला शासकीय मदत मिळण्याची गरज आहे, अन्यथा या व्यवसायाला अखेरचा श्वास घ्यावा लागेल.

गरीबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठाला ग्रामीण, तसेच शहरी भागात ऐन उन्हाळ्यात मागणी असते. काळाच्या ओघात आधुनिक यंत्र आली आणि पारंपरिक पद्धती मागे पडू लागल्या. त्याचप्रमाणे फ्रीजमुळे या मातीच्या माठांची मागणी घटली आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आजदेखील कुंभार समाजातील अनेकांनी आपली हस्तकला जपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. ऐन उन्हाळ्यात या मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते.

- Advertisement -

काळाच्या ओघात माठ बनवण्याची कला आता मागे पडू लागली आहे. याकरिता लागणारी माती जरी मोफत असली तरी अन्य साहित्य मात्र विकत घेऊनच माठ तयार करावे लागतात. मातीच्या माठाची मागणी घटली असल्यामुळे त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. तरीही माठ, मातीच्या चुली, घराची कौले बनवण्याची कामे ठराविक लोक करतात. तालुक्यात शहरासह बिरवाडी, दासगाव आदी गावांतून माठ बनवले जात होते. बिरवाडी येथील कुंभारवाड्यातील जवळपास 80 घरांमधून केवळ सात ते आठ घरातच माठ बनवले जातात.

महाड, तसेच बिरवाडीमध्ये औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत. यामुळे अनेकांना माती देखील विकत घ्यावी लागत आहे. मातीपासून माठ बनविताना चाकाचा वापर केला जात नाही. ही माती पायाने तुडविण्यास दोन तास लागतात. मडक्याच्या आकाराच्या साच्यावर माती थापून त्याला हाताने आकार देत मडके बनविण्याची कला अवघड आहे. त्यानंतर हे कच्चे मडके भट्टीत टाकले जाते. यामध्ये अनेकवेळा नुकसानदेखील सहन करावे लागते, असे बिरवाडी कुंभारवाडी येथील दगडू सावादकर यांनी सांगितले.

- Advertisement -

राजस्थानी माठ आणि स्थानिक कारागिरांनी तयार केलेले माठ यात फरक आहे. राजस्थानी माती पांढर्‍या रंगाची असते किंवा चिनी मातीसुद्धा वापरली जाती. ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या माठात पाणी थंड राहण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना मोठी मागणी आहे. मात्र राजस्थानी माठ हे अल्प दरात आणि वजनाने हलके असल्याने मोठ्या प्रमाणात विकले जातात. यामुळे पारंपरिक पद्धतीने माठ बनविणार्‍यांवर गदा आली आहे. त्यामुळे पारंपरिक माठ बनविण्याचा व्यवसाय करणार्‍यांनी शासनाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आमची नवी पिढी या व्यवसायात राहिली नाही. मेहनत, खर्च अधिक असून मातीच्या माठांची मागणी कमी झाली आहे. माठ आणि चुली बनविताना आपली कला जपण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो.
-अनिता दगडू सावादकर, कुंभार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -