उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंना त्याच स्टाईलमध्ये प्रत्युत्तर!

हिंदुत्वावरून राज ठाकरेंनी केलेल्या टिकेला उद्धव ठाकरेंनी देखील त्याच स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज ठाकरेंनी १४ वर्षांत घेतलेल्या मनसेच्या पहिल्या वहिल्या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली होती. ‘झेंड्याचा रंग बदलला म्हणून चर्चा सुरू झाली राज ठाकरे बदला म्हणून. पण मी आजही तसाच आहे. राज ठाकरेचा रंग आजही तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो’, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याला आता उद्धव ठाकरेंनी तितक्याच कडवट शब्दांमध्ये टीका केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज ठाकरेंच्या वाक्याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी देखील थेट राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ‘अशी टीका झाली की आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो. आम्ही रंग बदलला. पण ना आमचा रंग आम्ही बदलला आहे, ना अंतरंग बदललं आहे. आमचा रंग देखील भगवाच आहे आणि आमचं अंतरंग देखील भगवंच आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या प्रत्युत्तरामुळे आता या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा ‘अप्रत्यक्ष’ टीका-टिप्पणी झाल्याचं पाहायला मिळत आहे.


राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा!