घरमहाराष्ट्रVBA : मविआकडून वंचितला 5 जागांचा प्रस्ताव नाही; प्रकाश आंबेडकर उद्या जाहीर...

VBA : मविआकडून वंचितला 5 जागांचा प्रस्ताव नाही; प्रकाश आंबेडकर उद्या जाहीर करणार भूमिका

Subscribe

मुंबई – लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ आला आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे जागावाटप निश्चित झाल्याचे समोर येत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीशिवायच महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक लढविणार असेच चित्र समोर येत आहे. महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला चार ऐवजी आता एक जागा वाढवून अर्थात पाच जागांचा प्रस्ताव देत आहे. मात्र या प्रस्तावांची चर्चा माध्यमांमध्येच आहे. प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर किंवा वंचितच्या कोणत्याही नेत्यांना भेटून चर्चा केली जात नाही. वाढीव जागांच्या प्रस्तावाचे पत्र वंचितच्या कार्यालयात किंवा नेत्यांना पाठवलेले नाही. तसे पत्र दिले असेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ते समोर आणावे. जागा वाढवून दिल्याची चर्चा माध्यमांमध्येच होत असल्याचे वंचितच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा होती. प्रकाश आंबेडकरांनी ही चर्चा आतापर्यंत अनेकदा फेटाळून लावली आहे. आम्हाला एकदाच चर्चेसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर जागावाटपाच्या एकाही बैठकीत वंचितचे नेते सहभागी झाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

वंचितला 5 जागांचा प्रस्ताव नाही

वंचित बहुजन आघाडीला पाच जागा दिला जाणार असल्याचा प्रस्ताव असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत. असा कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नसल्याचे वंचितच्या सूत्रांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीने प्रस्ताव कोणत्या स्वरुपात दिला, असा सवाल वंचितच्या नेत्यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्या नेत्याची भेट घेऊन मविआने प्रस्ताव दिला, की ई-मेल पाठवण्यात आला? असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

महाविकास आघाडी कधीच जिंकू शकत नाही अशा जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्याची तयारी दाखवली जात आहे. युती-आघाडी ही सन्मानजनक असली पाहिजे, असेही वंचितच्या नेत्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीसोबत वंचितचेही उमेदवार विजयी होतील, अशा जागांचा प्रस्तावच देण्यात आला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई उत्तरची जागा वंचितला सोडण्याची तयारी दाखवली जात आहे. ज्या जागेची मागणी वंचितने कधीही केलेली नाही, असेही सूत्रांन म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव मान्य असल्याचे म्हटले आहे, मात्र वंचितने काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा दिल्याचा प्रस्ताव त्यांना मान्य आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा : Akola VidhanSabha : अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द, नागपूर खंडपीठाचे आदेश

चळवळीला लाचार केलं जात आहे – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज एक व्हिडिओ संदेश प्रसारित करुन शाहू-फुले-आंबेडकरी चळवळ लाचार केली जात असल्याचा आरोप कोणाचेही नाव न घेता केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिंकले पाहिजे ही आंबेडकरवादी मतदारांची भावना आहे. आपण अनेक ठिकाणी जिंकू शकतो अशी परिस्थिती आहे. मात्र चळवळीला लाचार करण्याच प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यांचा रोख नेमका कोणाकडे होते, हे स्पष्ट झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी जो निर्णय घेईल त्याला फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मतदारांचा पाठिंबा आहे, असे गृहित धरतो, असेही प्रकाश आंबडेकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी उद्या भूमिका जाहीर करणार

वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीत कोणासोबत असणार, की एकटेच लढणार? यासंबंधीची भूमिका उद्या बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर जाहीर करणार आहेत. त्याआधी आज संध्याकाळी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यानंतर अकोला येथे पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर पक्षाची लोकसभा निवडणुकीसंबंधीची भूमिका जाहीर करणार आहेत. प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -