घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरWeather Update : राज्यातील वातावरणात बदल, काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

Weather Update : राज्यातील वातावरणात बदल, काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

Subscribe

मुंबईसह राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतामध्ये पावसाने हजेरी लावली असून पुढील तीन दिवस हेच चित्र पाहायला मिळेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Weather Update: Changes in weather in the Maharashtra, yellow alert in some districts)

हेही वाचा… SSC Exam : ऑल द बेस्ट! दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस मुंबई आणि राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असून अवकाळी पावसाचीही शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज (ता. 01 मार्च) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश आहे. उद्या शनिवारी (ता. 02 मार्च) जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. तर, रविवारी 03 मार्चला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काल गुरुवारी मुंबईत कमाल तापमानाने 35 ते 37 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला होता. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल 4 अंशांहून अधिक होते. पुढील 24 तास वातावरण असेच राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरात पुढील 24 तासांमध्ये दुपारी किंवा संध्याकाळी वातावरण अंशत: ढगाळ असेल. तसेच कमाल तापमान 37 व किमान तापमान 24 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 48 तासांमध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 33 व किमान तापमान 22 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तर, पुण्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच पुण्यातील तळेगाव भागात पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तपमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच काही भागात गारपीट होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये ढगाळ वातावरण राहून उन्हाचे चटके कमी लागतील. दरम्यान, पुणे शहरात दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -