घरठाणेकळवा रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशीचे काय? अहवाल अद्यापही गुलदस्त्यात

कळवा रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशीचे काय? अहवाल अद्यापही गुलदस्त्यात

Subscribe

औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली असताना कळवा रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशीचे काय झाले? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

ठाणे : राज्यातील नांदेड, छत्रपती संभाजी नगर, नागपूर या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूमुळे सध्या खळबळ उडाली आहे. रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे होत आहेत? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. परंतु, औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या घटना घडत असताना कळवा रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशीचे काय झाले? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 10 तारखेला 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर लगेच 13 तारखेला 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळब उडाली होती. (What about the inquiry into the deaths of patients at Kalwa Hospital? The report is still pending)

हेही वाचा – रुग्णालयात दाखल व्हावे आणि… वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा आधार घेत सचिन सावंतांचा निशाणा

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कळव्यामध्ये ही घटना घडल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. ज्यानंतर त्यांनी तेथील रुग्णांची परिस्थिती पाहून संतापही व्यक्त केला. यानंतर राज्य सरकारकडून या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अहवाल हा 25 ऑगस्टपर्यंत येणे अपेक्षित होते, परंतु आज दीड महिना उलटूनही कळवा रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यू संदर्भातील अहवाल समोर आलेला नाही.

काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कळवा रुग्णालयातील घटनेसंदर्भात माहिती देत सांगितले होते की, चौकशी अहवालातून योग्य तो निर्णय पुढे येईल, तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या घटनेच्या अहवालाला उशीर होत असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. पण त्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा विविध कामात व्यस्त झाल्याने या घटनेच्या अहवालाकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे चौकशी समितीने चौकशी पूर्ण करून याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. पण हा अहवाल उघड करण्यासाठी राज्य सरकारकडे वेळ नसल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

तर आता नांदेड रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी देखील त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून या समितीमार्फत या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या समितीच्या मार्फत रुग्णांच्या नातेवाईकांनी ज्या काही तक्रारी केल्या आहेत, त्याची देखील चौकशी केली जाणार आहे. ज्यानंतर या समितीकडून या घटनेची सखोल चौकशी करून पुढील तीन ते चार दिवसांत अहवाल देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेचा अहवाल तरी लवकर उघड करण्यात येईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -