घरमहाराष्ट्रराजीनामा का स्वीकारला नाही? मुंबई पालिकेला तासाभराचा अल्टिमेटम, उच्च न्यायालयाने फटकारले

राजीनामा का स्वीकारला नाही? मुंबई पालिकेला तासाभराचा अल्टिमेटम, उच्च न्यायालयाने फटकारले

Subscribe

हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने न्यायालयानेही आता पालिकेला फटकारले आहे. राजीनामा अद्याप का स्विकारला नाही, याचं येत्या तासाभरात उत्तर द्या, असा अल्टिमेटम पालिकेला देण्यात आला आहे. 

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, मुंबई पालिकेतील नोकरीचा त्यांचा राजीनामा अद्यापही स्वीकारण्यात आला नसल्याने ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. दरम्यान, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने न्यायालयानेही आता पालिकेला फटकारले आहे. राजीनामा अद्याप का स्वीकारला नाही, याचं येत्या तासाभरात उत्तर द्या, असा अल्टिमेटम पालिकेला देण्यात आला आहे.

आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. शिंदे गटाने केलेल्या खेळीमुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत आला आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, त्या मुंबई पालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांना महिनाभर आधी राजीनामा देणे बंधनकारक आहे. आता यावरूनच कलगीतुरा रंगलेला आहे. ऋतुजा यांनी २ सप्टेंबर रोजीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण राजीनामा पत्रात त्रुटी असल्याचं सांगण्यात आलं. लटेक यांनी पुन्हा ३ ऑक्टोबर रोजी नव्यानं राजीनामा दिला. पण त्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय पालिका अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. राजीनामा स्विकारण्यासाठी ऋतुजा लटके यांनी काल स्वतःहून महापालिका आय़ुक्तांचीही भेट घेतली. आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आज या याचिकेवर सुनावणी झाली.

- Advertisement -

पालिकेने राजीनामा स्विकारण्यास दिरंगाई केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला फटकारले आहे. पालिकेचा क वर्गातील कर्मचाऱ्याला जर निवडणूक लढवायची असेल तर नियमाप्रमाणे तुम्ही याआधीही राजीनामा स्विकारला आहे. पण याच प्रकरणात भेदभाव का? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला आहे. तसंच, दुपारी अडीच वाजेपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -