घरमहाराष्ट्रदादरचे शिवसेना भवन शिंदे गटाला मिळणार का?, तज्ज्ञ म्हणतात...

दादरचे शिवसेना भवन शिंदे गटाला मिळणार का?, तज्ज्ञ म्हणतात…

Subscribe

उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आता कोणत्या शाखेत किंवा जागेत जाऊन बसणार हाच प्रश्न ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला पडू लागला आहे. खरं तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा शिंदे गटाला याबाबत सूचक इशारा दिला आहे

मुंबईः शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर मोठ्या राजकीय उलथापालथींना सुरुवात झालीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर राज्यभरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. शिवसेना पक्ष हा शिंदेंच्या ताब्यात गेल्यानं राज्यभरातील प्रत्येक जिल्हा, गावा-गावांतील शिवसेनेची कार्यालयं, तिथली प्रॉपर्टी एकनाथ शिंदे म्हणजेच शिवसेनेची होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. विशेष म्हणजे शिंदे गट आता शिवसेना भवनावरही दावा करणार का? हाच प्रश्न सामान्य शिवसैनिकाला सतावतोय. कारण खरी शिवसेना ही शिंदेंची असल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्णय दिल्यामुळे शिवसेनेच्या मालकीची सगळीच मालमत्ता आता शिंदेंच्या मालकीची होणार असल्याचं बोललं जातंय.

दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आता कोणत्या शाखेत किंवा जागेत जाऊन बसणार हाच प्रश्न ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला पडू लागला आहे. खरं तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा शिंदे गटाला याबाबत सूचक इशारा दिला आहे. शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा कोणाकडेही जाणार नाहीत. शिवसैनिक हे त्या शाखेतच बसतील. तिथेच बसून पक्षाचं काम पाहतील. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, असंही संजय राऊतांनी ठणकावून सांगितलंय. परंतु संजय राऊत असं बोलत असले तरी शिवसेना भवन शिंदे गटाला मिळणार का प्रश्न अनुत्तरितच आहे.

- Advertisement -

शिवसेना भवनावरील बाळासाहेबांचा फोटो, भगवा झेंडा आणि शिवसेना शाखा अजूनही शिवसैनिकांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे. शिवसेनेच्या शाखेतूनच अनेक नेते नगरसेवक, आमदार आणि खासदार झालेत. परंतु आता शिवसेना भवनासह शाखा शिंदे गट ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्यानं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांत प्रचंड असंतोष आहे. आता राज्यातील सगळ्या शिवसेनेच्या शाखा हा एकनाथ शिंदे गट बळकावणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना दिल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयातही आपला दावा मजबूत करण्यासाठी शिंदेंना राज्यातील सर्व शिवसेनेच्या शाखा ताब्यात घ्याव्या लागणार आहेत.

खरं तर शिवसेना भवन आणि राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा नियंत्रणात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात हिंसक झटापट होण्याची शक्यता आहे. परंतु शिवसेना भवन हे शिंदे गटाला ताब्यात घेता येणार नाही. कारण त्या इमारतीची मालकी ही शिवाई ट्रस्टकडे आहे आणि शिवाई ट्रस्ट ही शिवसेना पक्षाच्या मालकीची नाही. शिवसेना भवनची इमारत ही शिवसेना पक्षाच्या नावावर नाही. त्यामुळे साहजिकच ती अधिकृतरीत्या पक्षाच्या मालकीची नसल्यानं उद्धव ठाकरेंच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाची छपाई ही प्रबोधन प्रकाशनाच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे त्याचाही शिवसेना पक्षाशी थेट असा कोणताच संबंध नाही. राज्यात शिवसेनेच्या शाखा वेगवेगळ्या नावांवर आहेत. तसेच ज्या कोणाच्याही नावांवर नाहीत, त्या शाखांवर शिवसेना पक्ष म्हणजेच शिंदे गट दावा करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शाखा ताब्यात घेण्यावरून कोकणात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये वादावादी झालीय. तशाच प्रकारची वादावादी राज्यातील इतर भागांमध्येही झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

- Advertisement -

हेही वाचाः ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; कसबा पेठ, चिंचवड निवडणुकीपर्यंतच वापरता येणार मशाल चिन्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -