Winter session 2021 : विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूरलाच घ्या, विदर्भातील नेत्यांची मागणी

state government is working in change the rules for the election of the Speaker of the Assembly

पावसाळी अधिवेशनात घोषित झाल्यानुसार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे व्हावे, अशी विनंती माजी आमदार आणि नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आशीष देशमुख यांनी शनिवारी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

विदर्भातील उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, सिंचन, पर्यटन, गुंतवणूक, सर्वांगीण विकास असे अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्व आहे. या प्रलंबित प्रश्नांवर सरकारकडे कुठल्याही उपाययोजना आणि धोरण नाही म्हणून हे अधिवेशन टाळले जात आहे, अशी भावना जनतेकडून आणि विदर्भातील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे, याकडे देशमुख यांनी ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूर येथे सुरू होणार असल्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्र्यांवर झालेली शस्त्रक्रिया यामुळे अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता असून ते नागपूर ऐवजी मुंबईत होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने शनिवारी वृत्त दिले होते.

या पार्श्वभूमीवर आशीष देशमुख यांनी  मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अधिवेशन नागपूर येथे घेण्याची विनंती केली आहे. या पत्रात देशमुख यांनी नागपूर कराराची आठवण करून दिली आहे. विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यापूर्वी नागपूर ही मध्यप्रांत आणि वऱ्हाडाची राजधानी होती. राजधानी मुंबई होणार असल्यामुळे इकडचे प्रश्‍न सोडवण्यात अडचणी येतील हे ओळखून तत्कालीन नेत्यांनी नागपूर करार केला. त्यानुसार विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे सुरू करण्यात आले. विदर्भाला न्याय मिळावा, या भागाचे प्रश्‍न सुटावेत, यासाठी हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात दरवर्षी घेण्यात येते. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे हे अधिवेशन घेण्यात आले नव्हते, असे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

मागील पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूरला होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. असे असतानाही हे अधिवेशन मुंबई येथे घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुंबई येथे विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायचे असल्यास, अधिवेशनाच्या ४५ दिवस आधी नियमानुसार विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होत असते. ठराविक तारखेला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला फक्त  २३ दिवस शिल्लक असताना सुद्धा ही बैठक अजून झालेली नाही. त्यामुळे  नियमानुसार मुंबई येथे हे अधिवेशन होऊच शकत नाही, असा दावाही त्यांनी  केला आहे.

सरकारचा संपूर्ण कारभार नागपुरात यावा. अधिवेशनाच्या आधी आणि नंतरही किमान एक-दोन आठवडे सरकारने येथे राहावे, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात गेली कित्येक वर्षे हिवाळी अधिवेशनात दहा-पंधरा दिवसांचे कामकाज होते आणि सरकार मुंबईला परत जाते. त्यामुळे विदर्भाचे प्रश्‍न सुटत नाहीत. नागपूर कराराचा सन्मान म्हणून, विदर्भाच्या विकासासाठी असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हे हिवाळी अधिवेशन किमान सहा आठवडे चालावे, अशी मागणी आशीष देशमुख यांनी केली आहे.

कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव नागपूर येथे अजून तरी झाला नाही. लसीकरणसुद्धा मोठ्या प्रमाणात झाले आहे.  परिणामी अधिवेशन काळात कोरोनाची भीतीसुद्धा कमी झाली आहे.  त्यामुळे नागपूर येथे पूर्णकालीन हिवाळी अधिवेशन घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.


हेही वाचा – Winter session 2021 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?