खुशखबर ! महाराष्ट्रात आता महिला पोलिसांना ८ तास ड्युटी, पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा डॅशिंग निर्णय

mumbai-police 8 hours duty

राज्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा देणारा निर्णय हा पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी घेतला आहे. संपूर्ण राज्यातील पोलीस महिला अंमलदार यांना ८ तासांची ड्युटी देण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. कामाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षक यांना आपल्या अधिपत्याखालील महिला अंमलदार यांना ८ तासांची ड्युटी द्यावी असे आदेश संजय पांडे यांनी जारी केले आहेत. त्यामध्ये पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस शिपाई तसेच पदसिद्ध कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. राज्यात एकुण १ लाख ९२ हजार पोलीस कर्मचारी आहेत. त्यापैकी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ३० हजारांच्या घरात आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महासंचालक पदाची सूत्रे घेतल्यानंतरचा हा सर्वात धाडसी निर्णय मानला जात आहे. पोलीस महासंचालक पदावर रूजू झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत धाडसी असे ९ निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच एक पोलीस महिला कर्मचाऱ्यांना ८ तास ड्युटी देण्याचा निर्णय आहे.

याआधीच राज्यातील महिला पोलीस अंमलदार यांची दिवसाची ड्युटी ८ तास करण्याचा विचार झाला होता. सध्या राज्यातील पोलीस अंमलदार यांची दिवसाची ड्युटी ८ तास केल्यास त्यांच्या रजा मागण्याचे प्रमाण, रूग्णनिवेदन करण्याचे प्रमाण तसेच गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच कुटुंबाला जास्त वेळ दिल्याने ताण तणावही कमी होईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

राज्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पोलीस ठाणे आणि शाखा याठिकाणी महिला अंमलदार यांना दिवसभरात ८ तासांची ड्युटी दिली जाईल याची खात्री करावी असेही आदेशात म्हटले आहे.

तर ड्युटी वाढणार

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या वेळी तसेच महत्वाचे सण आणि उत्सव या कालावधीत अपवादात्मक परिस्थितीत महिला अंमलदार यांच्या कर्तव्याची गरज भासेल अशा वेळी प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्त यांच्या परवानगीने वेळ वाढवून ड्युटी देता येणार आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त (लोहमार्ग), बृहन्मुंबई, सर्व पोलीस अधीक्षक (लोहमार्गासह) यांना हा आदेश देण्यात आला आहे.

एकटा संजय पांडे बदल करायला पुरेसा नाही, डीजीपींची व्यथा

याआधी राज्य महिला आयोगाच्या कार्यक्रमात पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. एकटा संजय पांडे बदल करायला पुरेसा नाही, महिला आयोगाचा पाठिंबा मिळायला हवा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले होते. अनेक महिला पोलिसांना २४ तास ड्य़ुटी आहे. नागपूरसह काही ठिकाणी ८ तास ड्युटी आहे. पण सगळीकडे झालेले नाही. महिलांना घरी जाऊन जेवणासह अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. अशावेळी महिला कर्मचाऱ्यांना ८ तास ड्युटी व्हायलाच हवी अशीही मागणी

डीजीपी पांडेंचे ९ महिन्यातील ९ निर्णय

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी एप्रिल २०२१ मध्ये पोलीस महासंचालक पदाची सूत्रे सांभाळल्यापासून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये महिलांची ड्युटी ८ तास करण्याचा निर्णय हा अतिशय धाडसी निर्णय मानला जात आहे.

– एसआरपीएफ जवानाची जिल्ह्यातून बदलीची १५ वर्षांची अट १२ वर्षे करण्यात आली
– मागील नऊ महिन्यात १५ हजार नवीन पोलीस भरती
– विनाकारण निलंबित शेकडो कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले
– कॉन्स्टेबल टू पीएसआय पदोन्नती देण्याचा प्रस्ताव
– वर्षातील २० दिवस पोलिसांना किरकोळ रजा देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळासमोर
– पोलिसांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणली
– घर बांधणीसाठी ३०० कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर
– कोणताही कर्मचाऱ्याला पोलीस महासंचालकांना थेट भेटण्याचा पर्याय
– कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांकडे थेट गृह विभागाचा पाठपुरावा

प्रायोगिक तत्वावर कुठे प्रयोग 

राज्याच्या पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आदेश देण्याचा निर्णय हा २७ जानेवारीला घेण्यात आला. या दिवशीच आदेश पोलीस महासंचालकांच्या नावे जाहीर करण्यात आला. याआधी २७ सप्टेंबर रोजी नवी मुंबई, औरंगाबाद आणि अमरावती या शहरामध्ये ८ तासाच्या ड्युटीचा प्रयोग अंमलात आणला होता. या प्रयोगातील यश मिळाल्यानंतरच आणि एकुणच आढावा घेतल्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. यापूर्वी ८ तास ड्युटी देण्याचा निर्णय़ तत्कालीन दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिसांसाठी घेतला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांसाठी हा निर्णय अंमलातही आला होता.