घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'शिस्तीचे पालन करत संवेदनाशीलतेने काम करा'; नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना फडणवीसांचा कानमंत्र

‘शिस्तीचे पालन करत संवेदनाशीलतेने काम करा’; नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना फडणवीसांचा कानमंत्र

Subscribe

नाशिक : महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वात मोठे आणि शिस्तबद्ध दल आहे. या दलात येताना आनंद आहे, मात्र जबाबदारीची जाणीव देखील हवी. शिस्त मोडणे आपल्याकडून घडणार नाही याची काळजी घ्यावी. पण शिस्तीत संवेदना हरवून चालणार नाही. आपल्याकडे येणारे बहुतांश लोक दुखावलेले, अडचणीत असतात. अशावेळी आपली संवेदना जिवंत ठेवल्यास आपण कर्तव्यास निश्चितपणे न्याय देउ शकला असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या १२२ व्या बॅचच्या दिक्षांत समारंभाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रबोधिनीच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहूल आहेर, अ‍ॅड. राहूल ढिकले, पोलीस महासंचालक रजनिश सेठ, अपर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर, अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, येणारा काळ आव्हानांचा असून रस्ते गुन्हेगारी सोबतच सायबर व आर्थिक गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी या प्रशिक्षण प्रबोधिनीतून चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले आहे. या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेवून बाहेर पडणारे पोलीस हे देशसेवेत आपले कर्तव्य बजावतांना नेहमीच अग्रस्थानी असतात.

- Advertisement -

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे रक्षण करून वाईट प्रवृत्तींचा बिमोड करणे ही आपली आद्य जबाबदारी आहे. अनेकदा आमचे ट्रेनी अधिकारी देखील प्रलोभनांना बळी पडतात. भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना समान दर्जा दिला असून कर्तव्य पार पाडतांना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भारतीय संविधानाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी कायम प्राधान्य द्यावे. कोणी कितीही मोठा असला तरी चुकीला माफी नाही ही आपल्याला छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे. त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.दीक्षांत संचालन समारंभानंतर नूतन शैक्षणिक संकुल, मोटर परिवहन विभाग इमारत, अकॅडमी मुख्य प्रवेशद्वार व संरक्षक भिंत कोनशिलेचे अनावरण आणि भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

आपली वर्तणूक सद्भावपूर्ण असावी : रजनीश सेठ

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यावेळी बोलतांना म्हणाले की, प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस सेवेत रूजू होणार आहेत. समाजातील वंचित व शोषित घटकास समान न्याय व संरक्षण देणे ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. अवैध वाळू उपसा, अंमली पदार्थ या सारख्या असामाजिक गुन्हेगारीवर आपला अंकुश असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नागरिकांप्रती आपली वर्तणूक सद्भावपूर्ण असावी. गुन्ह्याचा तपास कायद्याला अभिप्रेत असलेल्या प्रक्रियेनुसार होणे अपेक्षित आहे. असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

४९४ उपनिरीक्षक पोलीस सेवेत दाखल

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण सत्र हे १ ऑगस्ट, २०२२ पासुन सुरु झाले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून निवड झालेल्या ३४९ पुरुष व १४५ महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश असुन १ प्रशिक्षणार्थी गोवा राज्याचे आहेत. एकुण ४९४ पोलीस उपनिरीक्षक यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणार्थी पैकी ८८% प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व १२% पदव्युत्तर आहेत, यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

काळे, परदेशी ठरले बेस्ट कॅडेट ऑफ द बॅच

अभिजीत भरत काळे: यशवंतराव चव्हाण गोल्ड कप – ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच रेणुका देवीदास परदेशी : अहिल्याबाई होळकर कप – ऑल राऊंड वूमन कॅडेट ऑफ द बॅच, रुबिया ताजुद्दिन मुलाणी : बेस्ट कॅडेट इन ड्रिल
प्रशांत हिरामण बोरसे : “एन.एम. कामठे गोल्ड कप” बेस्ट कॅडेट इन राफल अँड रिव्हॉल्वर शूटिंग, अभिजीत भरत काळे : रिव्हॉल्वर ऑफ हॉनर – बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच किरण सुभाष देवरे : डॉ. बी. आर. आंबेडकर कप – बेस्ट कॅडेट इन लॉ किरण सुभाष देवरे : सिल्व्हर बॅटन – बेस्ट कॅडेट इन स्टडीज, किरण सुभाष देवरे : सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच

अशी आहे नवीन शैक्षणक संकुल

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई अंतर्गत 13 हजार 846 चौरस मीटर जागेत 79 कोटी 68 लाख 61 हजार 908 रुपयांचे नवीन शैक्षणिक संकुल व इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 26 वर्ग खोल्या, 1 सायबर लॅब, 1 संगणक लॅब, 1 स्टाफ रूम, 1 कॉन्फरन्स हॉल असणार आहे. तसेच मोटर परिवहन विभाग इमारत, प्रवेशद्वार, टेहाळणी टॉवर, संरक्षक भिंत याप्रमाणे इतर पायाभूत सुविधा या शैक्षणिक संकुलात उपलब्ध होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -