तुम्ही मुंबईत या, मी स्वतः एअरपोर्टवर स्वागताला येईन; बंडखोर आमदारांना संजय राऊतांचं आवाहन

बंडखोर आमदारांना संजय राऊत यांनी पुन्हा आवाहन केलं आहे. तुम्ही मुंबईत या, मी स्वतः एअरपोर्टवर स्वागताला येईन, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं. (You come to Mumbai, I will personally greet you at the airport; Sanjay Raut’s appeal to sena’s rebel MLAs)

जो होना है वो होने दो, जो करना है करने दो, पण त्यांना मुंबईत तर यावंच लागेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, शिवसैनिक आमच्या पाठिशी आहेत. ते आमच्या एका आदेशाची वाट पाहत आहेत. पण आम्ही संयम ठेवला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर सर्वांचा विश्वास आहे असंही संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेबांचे भक्त आहोत सांगून पाठित खंजिर खुपसला गेला असल्याचंही संजय राऊत म्हणाले. तसेच, बंडखोरातही बंडखोर असू शकतात. अनेक बंडखोर आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना परत यायचंय असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

अडीच वर्ष मंत्रीपदाची मलाई खाल्ली तेव्हा त्यांना अन्याय समजला नाही का? आता अडीच वर्षांनी त्यांना साक्षात्कार झाला का? ते पुढे म्हणाले की, आसाममध्ये पूर आलाय. हॉटेलबाहेर पाणी साचलंय. मृतदेह तरंगत येत आहेत. आणि हे आमदार हॉटेलमध्ये पार्टी करतायत, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.