घरमहाराष्ट्रपाच जिल्हा परिषदेत विधानसभेची पुनरावृत्ती

पाच जिल्हा परिषदेत विधानसभेची पुनरावृत्ती

Subscribe

राज्यात सर्वाधिक जागा भाजपला, सत्ता मात्र महाविकास आघाडीची

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक जागा भाजपला (१०३) मिळाल्या असतानाच काँग्रेस (७४), राष्ट्रवादी काँग्रेस (४३), शिवसेना (४८) या पक्षांच्या महाविकास आघाडीमुळे धुळे वगळता इतर पाच जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता मिळणार नाही. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांचे होमपिच असलेली नागपूर जिल्हा परिषदही भाजपने सात वर्षांनंतर गमावली असून, येथे काँग्रेस आघाडीने मुसंडी मारली. तर काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अमरिश पटेल यांच्या करिष्म्यामुळे 30 वर्षे काँग्रेसकडे असलेल्या धुळे जिल्हा परिषदेवर भाजपने दुसर्‍यांदा कमळ फुलवले आहे. नंदूरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसला समसमान जागा मिळाल्याने सेनेसोबत महाविकास आघाडी सत्तेत येईल.

पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. या निवडणुकीत राज्याच्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला सहापैकी केवळ एकाच जिल्हा परिषदेची सत्ता मिळणार आहे. धुळे वगळता सर्व ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सत्तेत आल्याचे चित्र आहे. सहा जिल्ह्यांत मंगळवारी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

- Advertisement -

धुळ्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र तिकडे नागपूरमध्ये भाजपचा गड काँग्रेसने उद्ध्वस्त केला आहे. पालघरमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि भाजपला समसमान 23 जागा मिळाल्या; पण इथे महाविकास आघाडीचा विजय झाला. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा वंचित आघाडी सर्वात मोठा पक्ष ठरला. तर वाशिममध्येही वंचित आघाडीने चांगली कामगिरी केली.

नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण 58 जागांपैकी काँग्रेसला 30, राष्ट्रवादीला 10, भाजप 15, शिवसेना 1, अपक्ष 1 तर शेकापला एका जागेवर यश मिळाले आहे. नागपूर जिल्हा परिषदेवर यापूर्वी भाजपचं वर्चस्व होतं. जिल्ह्यात 58 जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 270 उमेदवार व पंचायत समितीच्या 116 गणांसाठी 497 उमेदवार रिंगणात होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात या निवडणुका होत असल्याने राजकीयदृष्ठ्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नागपूर जिल्ह्याला तीन मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची लढाई झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती तर शिवसेना स्वतंत्र लढत होती.

- Advertisement -

बावनकुळे यांचे तिकीट कापल्याचा फटका
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. बावनकुळेंचे तिकीट कापल्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपला बसला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीत तो मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो आहे.आजी-माजी मंत्री पुत्र जिंकले. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मंटपांजरा सर्कलमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र राष्ट्रवादीचे सलील देशमुख तर हिंगणा तालुक्यातील रायपूर सर्कलमध्ये माजी मंत्री रमेश बंग यांचे पुत्र राष्ट्रवादीचे दिनेश बंग विजयी झाले आहेत.

धुळ्यात अमरिश पटेल यांचा करिष्मा
धुळे जिल्हा परिषद हा काँग्रेसचा गड मानला जातो. या जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता मिळाली नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरिश पटेल हे भाजपत सामील झाले आणि जिल्ह्यातील राजकारण बदलले. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर विजयश्री खेचून आणली. धुळेतील जिल्हा परिषदेच्या १४ पैकी १४ जागा आणि पंचायत समितीच्या २८ पैकी २७ जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने धुळे जिल्हा परिषदेने भाजपची लाज राखली आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -