पश्चिम रेल्वेवर १५२९ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे

CCTV to be installed on Central and Harbour line railway stations
रुळाशेजारी बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे

लोकल, रेल्वे स्थानक आणि परिसरातील गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता आणि सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जुने कॅमेरे बदलून त्याजागी नवीन २ हजार ७२९ कॅमेरे लावले जात आहेत. यात सुमारे १ हजार ५२९ नवीन कॅमेरे नव्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

रेल्वेची सुरक्षा व्यवस्था होणार बळकट

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनातर्फे अनेक उपायोजना करण्यात येत आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारपर्यंत एकूण १ हजार २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. हे जुने कॅमेरे बदलून त्याजागी २ हजार ७२९ आधुनिक कॅमेरे बसवण्यात येत असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. हे काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. यात नवीन १ हजार ५२९ कॅमेर्‍यांचा समावेश आहे. बोरीवली स्थानकातील प्रवाशांची गर्दी पाहता येथे सर्वाधिक ३२५ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर मुंबई सेंट्रल ३१५, वांद्रे टर्मिनस १७०,अंधेरी १९२, चर्चगेट १५७, गोरेगाव १३७, जोगेश्वरी १३६, कांदिवली ११६, बोईसर ११५, दहिसर ११३ कॅमेरे लागणार आहेत. याशिवाय मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रॅन्ट रोड, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, दादर, माटुंगा, माहिम,वांद्रे, खार, सांताक्रुझ, विलेपार्ले, राममंदिर, मालाड, मीरा रोड, भाईंदर, नायगाव, नालासोपारा, विरार स्थानकातही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे

महिलांच्या डब्यातील सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. रेल्वे हद्दीत एखादा गुन्हा घडल्यास त्याचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्हीची रेल्वे पोलिसांना मदत होते. परंतु सीसीटीव्हीची कमी संख्या आणि त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने त्याचा म्हणावा तसा फायदा रेल्वे आणि पोलिसांना होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे.