घरमुंबईरेल्वेतून 2 हजार होमगार्डची कपात

रेल्वेतून 2 हजार होमगार्डची कपात

Subscribe

महिला प्रवाशांची सुरक्षा पुन्हा वार्‍यावर

वेतनाकरिता निधी नसल्याचे कारण देत मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील 2 हजार होमगार्डची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीचा रेल्वे प्रवास करणार्‍या महिला प्रवासी हादरून गेल्या आहेत.अनेक महिला प्रवाशांनी होमगार्ड कमी केल्याबद्दल आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. महिलांच्या डब्यात सुरक्षा रक्षक ठेवण्याच्या मागणीसाठी आता महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

लोकल प्रवासात महिला प्रवाशांची छेडछाड, विनयभंग, मारहाणीचे प्रकार होतात. महिला प्रवाशांवर गर्दुल्ल्यांकडूनही हल्ले झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत २१२ लोकलच्या प्रत्येक तीन महिला डब्यांमध्ये होमगार्डची नियुक्ती करण्यात आली होती.

- Advertisement -

पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील स्थानक आणि लोकल गाड्यांमध्ये मिळून दीड हजार होमगार्ड तैनात होते. मात्र, आता वेतनाकरिता निधी नसल्याचे कारण देत लोहमार्ग पोलिसांकडे असलेले 2 हजार होमगार्डना सेवेतून दूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता महिला डब्यात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नसतो. त्यामुळे महिला प्रवाशांना रात्रीच्यावेळी प्रवास करणे कठीण झाले आहे. अनेकांनी यासंबंधी रेल्वे ट्वीटरवर तक्रारी केल्या. मात्र रेल्वेकडून प्रतिसाद मिळत नाही. आता महिलांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी संख्येने अपुर्‍या असलेल्या लोहमार्ग पोलिसांना (जीआरपी) पेलावी लागणार आहे.

रेल्वेचा फक्त गाजावाजा..
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करत असल्याचा आव रेल्वे सातत्याने आणत असते. लोकलमध्ये सीसीटीव्ही आणि पॅनिक बटण लावण्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. मात्र, आजपर्यंत ही सुविधा प्रत्यक्षात उतरताना दिसून येत नाही. रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची ग्वाही देणारे रेल्वे प्रशासन आज महिला प्रवाशांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही. ट्विटरवर महिला प्रवाशांना दाद मिळत नाही, अशी प्रतिक्रिया महिला प्रवाशांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.

- Advertisement -

महिलांसाठी रेल्वे प्रवास हा तापदायक आहे. संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत बर्‍याच महिलांना संकटांना तोंड द्यावे लागते. महिला व मुलींना अजून ही रात्र वैर्‍याचीच आहे.रेल्वेनी आणि राज्य सरकारने यावर लक्ष द्यावेत.
– आरती परब, आम्ही दिवा महिला प्रवासी संघटना

महिला प्रवाशांसाठी उपलब्ध मनुष्यबळातून सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत आहोत. -रवींद्र सेनगावकर,
पोलीस आयुक्त, लोहमार्ग

होमगार्ड कपातीचा निर्णय अतिशय खेदकारक आहे. आजही लोकलच्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे महिला सुरक्षित प्रवासासाठी पुन्हा महिला डब्यात सुरक्षा रक्षक तैनात या मागणीसाठी लवकरच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत.
-वंदना सोनावणे, अध्यक्षा ,महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -