घरमुंबईचोरीच्या संशयावरुन 35 वर्षांच्या व्यक्तीची हत्या

चोरीच्या संशयावरुन 35 वर्षांच्या व्यक्तीची हत्या

Subscribe

पळून गेलेल्या दोन मारेकर्‍यांना अटक व कोठडी

चोरीच्या संशयावरुन एका 35 वर्षांच्या व्यक्तीची हत्या करुन पळून गेलेल्या दोन मारेकर्‍यांना डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्वर मधुकर पवार आणि विक्की श्री पवार अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी सनी रमेश खारवा याला पोलिसांनी अटक केली होती. इतर दोघांच्या अटकेने या गुन्ह्यातील तिन्ही मारेकर्‍यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 28 ऑक्टोंबरला दुपारी पावणेतीन वाजता ग्रँटरोड रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पुलाजवळ एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे पोलिसांना एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आला. त्यामुळे त्याला पोलिसांनी जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या तरुणाची ओळख पटली नव्हती, त्यामुळे त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. प्राथमिक तपासात या तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.

घटनास्थळीचे सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांना तीन तरुण संशयास्पदरीत्या दिसून आले. या तिघांनी मृत तरुणाला हाताने तसेच लाथ्याबुक्यांनी मारहाण केल्याचे उघडकीस आले होते. आरोपींचा शोध सुरु असतानाच मंगळवारी 29 ऑक्टोंबरला सायंकाळी सनी खारवा या संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत सनीने त्याच्या सामानाची मृत तरुणाने चोरी केल्याचा संशय होता. त्यामुळे त्याला त्याच्यासह विकी आणि नान्याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. या कबुलीनंतर सनीला हत्येच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली.
त्याच्या चौकशीत इतर दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच विकीला गुरुवारी तर ज्ञानेश्वरला शनिवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून गुन्ह्यात वापरलेला लाकडी बांबू पोलिसांनी जप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -