मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात ९५ टक्के जलसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या २४ तासांत दमदार पाऊस पडल्याने तलावात ९५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील वर्षी निम्म्या पावसाळ्यापर्यन्त पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार नाही.

MUMBAI

मुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या २४ तासांत दमदार पाऊस पडल्याने पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या तलावांत १३ लाख ८१ हजार ५० दशलक्ष लिटर (९५.४२ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार, हा पाणीसाठा मुंबईला पुढील जवळजवळ ३५८ दिवस म्हणजेच पुढील ८ ऑगस्ट २०२३ पर्यन्त पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील वर्षी निम्म्या पावसाळ्यापर्यन्त पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारे जवळजवळ सर्वच तलाव भरल्यात जमा आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बाब खूपच आनंददायी व दिलासा देणारी आहे.

वास्तविक, पावसाळा सुरू झाल्यावर संपूर्ण जून महिन्यात मुंबईकरांना अपेक्षित पाऊस तलाव क्षेत्रात न पडल्याने मुंबई महापालिकेने मुंबईकरांवर १० टक्के पाणीकपात लादली होती. सुदैवाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने व तलावातील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाल्याने पालिकेने काही दिवसातच पाणीकपात रद्द केली. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला.आता जुलै महिन्यात व ऑगस्ट महिन्यातही तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने चार तलाव भरले असून उर्वरित तीन तलाव जवळजवळ भरण्याच्या स्थितीत आहेत.

सध्या सर्व सात तलावांत मिळून एकूण १३ लाख ८१ हजार ५० दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील ११ महिन्यांपेक्षाही जास्त कालावधीसाठी पुरेल इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. त्याशिवाय पावसाचा आणखीन दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रात आणखीन चांगला पाऊस पडून सर्वच तलाव भरून वाहू लागतील. परिणामी पुढील वर्षी मुंबईकरांना कदाचित पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही.

सात तलावातील पाणीसाठा, टक्केवारी –

तलाव         पाणीसाठा     टक्केवारी

उच्च वैतरणा  २,०८,७२४     ९१.९३

मोडकसागर  १,२८,९२५      १००.००

तानसा          १,४४,७७०    ९९.७९

मध्य वैतरणा    १,८४,५३५     ९५.३५

भातसा          ६,७८,३५३     ९४.६०

विहार            २७,६९८       १००.००

तुळशी           ८,०४६         १००.००
———————————————————-
एकूण –         १३,८१,०५०     ९५.४२