घरताज्या घडामोडीठाण्यातील बदलाची स्पंदने ‘आपलं महानगर’मधून उमटतील

ठाण्यातील बदलाची स्पंदने ‘आपलं महानगर’मधून उमटतील

Subscribe

ठाण्यातील बदलाचा वेग प्रचंड आहे. त्यानुसार नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्याची वाढती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न ठाणे महानगरपालिका पार पाडत आहे. ठाण्यातील झपाट्याने होत असलेल्या बदलाची स्पंदने ‘आपलं महानगर’च्या ठाणे आवृत्तीतून उमटतील, अशी अपेक्षा ठाण्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाण्यातील चांगल्या कामाची दखल घेत काही सूचनाही कळवा, त्याची दखल नक्कीच घेतली जाईल, असे आश्वासन देत  महानगरला कोणतीही अडचण येणार नाही, अशा शुभेच्छा शिंदे यांनी दिल्या.

खणखणीत बातम्या आणि रोखठोक भूमिकेमुळे मुंबई आणि नाशिककरांचा विश्वास संपादन केल्यानंतर ‘आपलं महानगर’च्या ठाणे आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये पार पडला. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, ठाणे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, ठाणे पालिका सभागृह नेते अशोक वैती, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आणि ठाणे ग्रामीणचे अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, ‘आपलं महानगर’चे संपादक संजय सावंत, कार्यकारी संपादक संजय परब आणि नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ठाणे आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले. संपादक संजय सावंत यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ठाण्याचे पालकमंत्री, नागरिक आणि महानगरचा वाचक म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. ‘आपलं महानगर’ला मोठा वारसा आहे. चुकीच्या गोष्टींवर प्रहार आणि चांगल्या कामाचा सन्मान करणार्‍या दैनिकाची ठाणे आवृत्ती सुरू होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.

“स्वातंत्र चळवळीपासून वृत्तपत्रांचा वारसा आहे. टिळकांनी केसरी आमि मराठा, अत्रे यांनी नवयूग आणि मराठा तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक आणि सामनामधून सर्वसामान्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात वृत्तपत्राचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आम्ही नेते झालो असलो तरी कार्यकर्ते म्हणून काम करतो. कामे करताना कोणीतरी त्याची माहिती घेऊन बातमी करतो. ही बातमी मोठी येते, पण त्यावर आम्ही दिलेला खुलासा मात्र फारच छोट्या प्रमाणात येत असल्याची खंत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे बातमी करताना दोन्ही बाजू तपासण्याचा सल्लाही त्यांनी दिली.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दलित, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘मूकनायक’ वृत्तपत्र सुरू केल्याला आज १०० वर्ष पूर्ण होत आहे. त्याच दिवशी ‘आपलं महानगर’ही ठाण्यात सुरू होत असल्याचा योगायोग सांगत गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी ठाणे आवृत्तीला शुभेच्छा दिल्या. स्वातंत्रवीर सावरकरांनाही याच दिवशी ब्रिटीश सरकारने दुसर्‍यांदा जन्मठेपेची शिक्षा दिली होती. त्यामुळे ठाण्यातील ‘आपलं महानगर’चा प्रवेश हा एक मोठा योगायोग असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सांगत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे प्रताप सरनाईन, पल्लवी कदम यांनीही महानगरच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ठाण्याला गुरू-शिष्याची मोठी परंपरा लाभली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे आणि आनंद दिघे व एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व जीतेंद्र आव्हाड यांच्यातील गुरू-शिष्याचे नाते सर्वांना ज्ञात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत असताना आव्हाड हे शरद पवारांच्या पाठिशी ठाम राहिले. यातून ठाण्यातील निष्ठा दिसते. तसेच शिवसेनेतील एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जीतेंद्र आव्हाड या दोन्ही वेगवेगळ्या पक्षातील नेतृत्त्वाची मैत्री ही नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे. त्यामुळे ठाणे हे गुरू-शिष्याचे नाते, निष्ठेचे नाते व मैत्रीचे नाते आहे. त्याच मैत्रीच्या रुपातून आम्ही ठाण्यात येत आहोत. त्याचे तुम्ही स्वागत कराल अशी अपेक्षा ‘आपलं महानगर’चे संपादक संजय सावंत यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची प्रस्तावना मांडताना ‘आपलं महानगर’चे कार्यकारी संपादक संजय परब यांनी मुंबईचे जुळे शहर असलेल्या ठाण्यामध्ये दैनिक सुरू करण्याचा आमचा विचार होता. एकनाथ शिंदे व रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले. ठाण्यात होत असलेली नवीन सुरुवात ही आमच्यासाठी आनंदाची बाब असून हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आलेल्य उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.

राज्यात कोणाचाच विरोध नाही

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार नाही, अशी चर्चा असताना हे सरकार स्थापन झाले. तीन वेगळ्या विचार धारणेचे पक्ष एकत्र आले असले तरी किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. विकास कामे करताना आमच्या सरकारला कोणतीही अडचण येणार नाही. आता विरोधात असलेले पूर्वी मित्र होते. तर, सध्या सोबत असलेलेही नवीन मित्र आहेत. फडणवीस यांनीही चांगल्या कामाला पाठिंबा दिला आहे. उद्धव यांनीही फडणवीस यांना मदत केली आहे. त्यामुळे राज्यात कोणाचाच विरोध होणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रतिसाद दिला.

पोलिसांसाठी राखीव घरे ठेवणार

एसआरए, सिडको, म्हाडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हाऊसिंग योजना राबवण्यात येतात. या योजनांमध्ये पोलिसांसाठी राखीव घरे ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिला. पोलिसांची 12 तास ड्युटी आणि ठाण्यातून मुंबईत कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी त्यांना चार तास लागतात. या 16 तासांचा परिणाम त्यांच्या कर्तव्यावर होतो. तसेच सणासुदीला नेहमी रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना आपल्या स्वत:च्या घराची चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मी प्रयत्न करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -