घरमुंबईआरे मेट्रोसाठीच आरक्षित, हरित लवादाने दिला निर्णय!

आरे मेट्रोसाठीच आरक्षित, हरित लवादाने दिला निर्णय!

Subscribe

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला आरे वसाहतीतील कारशेडचा वाद आता मिटण्याची शक्यता आहे. हरित लवादाने यासंदर्भात 'वनशक्ती'ने केलेल्या याचिकेवर निर्णय दिला असून आरेतली जमीन मेट्रोच्या कामासाठीच आरक्षित असल्याचं स्पष्ट केलं आहे.

एकीकडे आरेमधील मेट्रोच्या कामाला होत असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे आरेमधील कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. आरे कारशेडसाठी मेट्रोच्या कामाला मज्जाव करणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने फेटाळली आहे. त्यामुळे आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुरुवारी हरित लवादाच्या दिल्लीतील प्रधान खंडपीठाने हा निर्णय जाहीर केला. वनशक्ती संस्थेतर्फे संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर लवादाने आरेसाठी हिरवा कंदील दाखविला. याचिकाकर्त्यांना प्रकरण मागे घेण्याच्या सूचनाही यावेळी लवादाने दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांंपासून सुरू असलेला आरे वन परिसराचा वाद आता मिटण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे आरेसाठी लढा देणाऱ्या पर्यावरण प्रेमींची मोठ्या प्रमाणावर निराशा झाली आहे.


वाचा – मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी: पाच मिनिटांचा प्रवास झाला अर्ध्या तासाचा

- Advertisement -

आरे मेट्रोसाठीच आरक्षित!

याचिकाकर्त्यांतर्फे आरे परिसर ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ म्हणून जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, या परिसराचा समावेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली होती. पण याआधीच पर्यावरण विभागाने आरे परिसर मेट्रो कामाअंतर्गत आरक्षित असल्याचे जाहीर सूचनेनुसार स्पष्ट केले होते.

हरित लवादाच्या निर्णयामुळे आता सर्व कायदेशीर अडचणी दूर झाल्या आहेत. कार डेपोचे आणि पर्यायाने प्रकल्पाचे काम अधिक गतिमान करणे शक्य होईल.

अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

मेट्रो ३ प्रकल्पातील पहिला ब्रेकथ्रू

दरम्यान, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पातील पहिल्या टनेलचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मरोळ नाका आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या दरम्यानच्या टनेलिंगचं हे काम २३ सप्टेंबरला पूर्ण होईल असा विश्वास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला वाटत आहे. मेट्रो ३ प्रकल्पात टनेल बोरिंगचा पहिला ब्रेकथ्रू २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. ब्रेकथ्रूच्या माध्यमातून पहिला टनेल पूर्ण करण्याचा टप्पा एमएमआरसी गाठेल. मरोळ नाका आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात टनेल बोरिंगच्या माध्यमातून आतापर्यंत १ किलोमीटरहून अधिक भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – मुंबई ‘मेट्रो’ संदर्भात मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय!


एकूण १७ टीबीएम खोदणार मुंबईची जमीन!

दरम्यान, या मेट्रो कामाअंतर्गत एकूण १७ टीबीएमचा वापर होणार आहे. त्यापैकी ८ टीबीएमद्वारे कामाला सुरुवात झाली आहे. त्याव्यतिरिक्त ५ टीबीएमद्वारे प्रत्येकी १ किलोमीटरहून अधिक भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. तर उर्वरीत ४ टीबीएमचं काम अद्याप सुरू झालेलं नाही.

सप्टेंबर अखेरीस सर्व टीबीएम कार्यरत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टीबीएम्सद्वारे ब्रेकथ्रू करण्याचा कार्यक्रम येत्या २४ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. तसेच मुंबईत दाखल झालेल्या १७ टीबीएम्सद्वारे सप्टेंबर अखेरीस पूर्ण क्षमतेने भुयारीकरणाचं काम सुरू होईल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -