घरमुंबईप्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करा - आदित्य ठाकरे

प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करा – आदित्य ठाकरे

Subscribe

मालाडच्या आप्पापाडा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. महापौर किशोरी पेडणेकर, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सुनील प्रभू यांची प्रमुख उपस्थिती

आरोग्य सुविधेसाठी नागरिकांना दोन किलोमीटरच्यावर जावे लागू नये, यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिका पी/ उत्तर विभागातील मालाड (पूर्व) च्या आप्पापाडा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी संपूर्ण आरोग्य केंद्राची पाहणी करून सोयी-सुविधांचा आढावा घेतला. आदित्य ठाकरे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आज या ठिकाणी सर्व आरोग्य सुविधांनी युक्त अशी वास्तू उभी राहिली आहे. याप्रमाणेच सर्व विभाग कार्यालयांमध्ये अशा सर्व आरोग्य सुविधांनी युक्त वास्तू उभ्या राहणे गरजेचे आहे. शिक्षण व आरोग्य हे किती महत्त्वाचे आहे, हे आपल्याला लॉकडाउनच्या काळात चांगलेच कळले आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचा कार्यक्रम आटपून येथे आलो असून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोना काळात आपण केलेल्या कामाचे जे कौतुक होत आहे, त्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी अभिनंदनास पात्र असून महापौर किशोरी पेडणेकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे व त्यांच्या टीमने चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. मुंबईकरांसाठी आपण जरी हळूहळू निर्बंध शिथिल करीत असलो तरी नागरिकांनी सणासुदीच्या काळामध्ये शिस्तीमध्ये सण साजरे करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. त्यासोबतच या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुंदर अशी वास्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सुनील प्रभू यांचे अभिनंदन केले.

कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. ही इमारत तळमजला अधिक सहा माळ्यांची असून तीन वर्षापूर्वी ही इमारत आपल्या ताब्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. हे आरोग्य केंद्र सर्व सुविधांनी युक्त होण्यासाठी स्थानिक आमदार सुनील प्रभू यांच्यासोबत वेळोवेळी बैठका घेतल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांसाठी याठिकाणी विशेष सुविधा असून लहान मुलांचे डॉक्टर याठिकाणी येऊन बालकांची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच गरोदर माता, स्तनदा माता यांची सुद्धा तपासणी याठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे ‘आपली चिकित्सा’ या कार्यक्रमांतर्गत अवघ्या पन्नास ते शंभर रुपयांमध्ये सर्व प्रकारच्या तपासणीचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. या ठिकाणी सर्व सुविधा मोफत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. आप्पापाडा परिसरातील नागरिकांना व्यापक स्वरूपात एकाच ठिकाणी आरोग्य सुविधा पुरविणे हे या आरोग्य केंद्राचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आप्पापाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी थोडक्यात

आप्पापाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबईतील पी/ उत्तर विभागातील विविध प्रकारच्या सुविधा देणारे एक आरोग्य केंद्र आहे. हे आरोग्य केंद्र झोपडपट्टी सदृश्य परिसरात वसलेले आहे. या परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधांकरीता बर्‍याच लांब असलेल्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. या केंद्रामुळे येथील नागरिकांना त्यांच्या परिसरात विविध आरोग्य सुविधा मिळणार आहेत. ज्यामुळे त्यांना या केंद्राचा नक्कीच लाभ होणार आहे. या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग, उपचार सुविधा, आरोग्य केंद्रामार्फत प्रतिबंधात्मक सेवा, माता व बाल सुविधा, कोविड लसीकरण, सर्व वयोगटातील नागरीकांसाठी शारीरिक तपासणी, प्रयोगशाळा सुविधा, सोनोग्राफी सुविधा देण्यात येणार आहे. मलेरिया,डेंगू व इतर आजारांसाठी, उच्च रक्तदाब व मधुमेह या आजारांसाठी या ठिकाणी विशेष तपासणी करण्यात येणार आहे.

याप्रसंगी खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सुनील प्रभू, उप महापौर ॲड. सुहास वाडकर, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, पी/ उत्तर विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, स्थानिक नगरसेवक आत्माराम चाचे, नगरसेविका साधना माने, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे उपस्थित होत्या.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -