घरमुंबईआदित्य ठाकरे वाट्टेल ते बोलत आहेत, जनता त्यांना उत्तर देईल, शिंदेंच्या मंत्र्यांनी...

आदित्य ठाकरे वाट्टेल ते बोलत आहेत, जनता त्यांना उत्तर देईल, शिंदेंच्या मंत्र्यांनी सुनावले

Subscribe

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी देखील चालू आहे. या दोन्ही पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. उद्या, १४ मार्चला सरकार पडणार असल्याची विरोधकांकडून टीका होत असताना त्याला शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेचे मंत्री आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंचा राजीनामा आमच्यापैकी एकानेही मागितलेला नाही. जर आपण आपली तत्व सोडली तर त्याला गद्दारी म्हणता येऊ शकते. पण ती गद्दारी कुणी केली? तत्व त्यांनी सोडली आम्ही नाही सोडली. असे असतानाही आम्ही कधी त्यांना गद्दार म्हटलेले नाही”, असेही दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -

आम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल आदर असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही. पण याचा गैरवापर आदित्य ठाकरे उचलत आहेत. ते आम्हाला वाट्टेल तसं बोलत चालले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची जनताच आदित्यला योग्य वेळी उत्तर देईल, असे दीपक केसरकर म्हणाले.

आदित्यच्या पर्यावरण मंत्रीपदावर बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, एखाद्या तरुण मुलाला मंत्री केल्यानंतर त्याने मंत्र्यासारखं वागलं पाहिजे, पण आदित्य ठाकरेंना ते जमलेले नाही. अडीच वर्षांत जनतेला न भेटणं, कार्यालयात न जाणं हेही आदित्य ठाकरेंना जमलेले नाही. मी कुठे आहे ते लोकांना माहिती असते, कारण मी प्रत्येकाला भेटतो. आम्ही जनतेचे मंत्री असून आम्ही जनतेसाठी काम करतो. उद्धटपणे बोलून फक्त गर्दी जमवता येते. त्यामुळे जनतेचे कधीही भले होत नाही. जर तुमच्यामध्ये जनतेबद्दल आपुलकी नसेल, तर तुमच्यासारख्या माणसांचा मंत्री असण्याचा काय उपयोग, असे म्हणत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले.

- Advertisement -

कोकणातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अजित पवारांनी केले आहे. मी यावर बोललो तेव्हा कोकणातला प्रत्येकजण हळहळला. कोकणच्या जनतेने तुम्हाला सत्ता दिल्यानंतर त्यांच्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत, याची व्हिडिओ क्लिप कोणीही पाहू शकतो. आदित्य ठाकरेंनी ही व्हिडिओ क्लीप पाहावी, जेणेकरून खरी जनता काय आहे हे त्यांना व्यवस्थित समजेल, असेही दिपक केसरकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -