घरताज्या घडामोडीखिचडीच्या तक्रारीनंतर आता पालिका देणार छोले पाव, मिसळ पाव, पोळी-भाजी

खिचडीच्या तक्रारीनंतर आता पालिका देणार छोले पाव, मिसळ पाव, पोळी-भाजी

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील गरीब, गरजू तसेच निराधार कुटुंबांना महापालिकेच्यावतीने जेवणाची व्यवस्था केली असली तरी सातत्याने अनेक भागांमध्ये केवळ खिचडीचाचा पुरवठा केला जातो. तर अनेक भागांमध्ये लोकांच्या हाती जाईपर्यंत हे जेवण खराब होते. त्यामुळे एकप्रकारे नगरसेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याने आता या जेवणाच्या पाकिटांद्वारे  पोळी-भाजी, छोले पाव आणि मिसळ पाव आदींचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून या नव्या पर्यायानुसार जेवणाचा पुरवठा केला जात आहे.

जेवणाच्या डब्यांच्या पुरवठ्यावर २० कोटींहून अधिक रुपये खर्च

कोरोनमुळे मुंबईत अडकलेल्या कामगारांसह गरीब आणि गरजू कुटुंबांना महापालिकेच्यावतीने जेवणाच्या पाकिटांचे वाटप केले जाते. सुरुवातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी लोकांना मदत केलेली असली तरी पुढे या संस्थांनी मदतकार्य चालू ठेवण्यास नकार दिला. काही ठिकाणी या संस्थांच्या माध्यमातून नव्याने संस्था आणि हॉटेल चालक आणि कॅटरर्सच्या माध्यमातून ४४ कम्युनिटी किचनमधून जेवणाची पाकिटे पुरवली जातात. संस्थांना धान्यांचा पुरवठा करणे तसेच त्यांना धान्यासाठी पैसे पुरवणे आवश्यक असल्याने त्यांना ३०० ग्रॅम खिचडी, पुलाव आणि बिर्याणी यासाठी ४० रुपये एवढा दर निश्चित हे जेवणाचे डबे बनवण्याचे कंत्राट दिले आहे. सुरुवातीला दोन्ही वेळेला तीन लाख जेवणाची पाकिटे पुरवठा करणारी महापालिका आता ४ लाख ६१ हजार एवढ्या पाकिटांचा पुरवठा करत आहे. मुंबईतील प्रत्येक नगरसेवकाला सुमारे ५०० ते ७००पाकिटांचा पुरवठा करण्यात येत असला तरी अनेक भागांमध्ये सातत्याने खिचडीचा पुरवठा होत आहे. तर अनेक भागांमध्ये लोकांच्या हाती जेवण जाईपर्यंत ते खराब होत असल्याने अनेक जेवणाचे डबे कचऱ्याच्या डब्यात जात आहे. आतापर्यंत या जेवणाच्या डब्यांच्या पुरवठ्यावर २० कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही भांडुप एस विभाग, मानखुर्द-गोवंडी या एम-पूर्व विभाग, गोरेगाव पी-दक्षिण विभाग, मालाड पी-उत्तर विभाग, दहिसर आर-उत्तर  विभाग, मुलुंड टी विभाग, विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या के-पश्चिम आदी विभागांमधून खराब जेवणाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. भाजपच्या जागृती पाटील यांच्या विभागात प्रथम तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर एम-पूर्वच्या प्रभाग समिती अध्यक्षा वैशाली शेवाळे, समिक्षा सक्रे, समृध्दी काते, प्रिती सातम, राजुल पटेल, सेजल देसाई आदी नगरसेवकांनी खराब जेवणाबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. तापमान वाढल्यामुळे गरमीमुळे ही जेवणाची पाकिटे खराब होत आहेत.

शुक्रवारपासून या नवीन मेन्यू प्रमाणे जेवणाचा पुरवठा

विशेष म्हणजे खिचडी, पुलाव आणि बिर्याणी हे तिन्ही पदार्थ एक दिवसआड करून वाटप करण्याची अट असतानाही काही संस्थांकडून सातत्याने खिचडीचा पुरवठा होत असल्याने या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने यापुढे चपाती-भाजी, छोले भटुरे तसेच मिसळ पाव आदी पदार्थांचा पर्याय सुचवला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून या नवीन मेन्यू प्रमाणे जेवणाचा पुरवठा या गरीब, गरजू कुटुंबासह स्थलांतरीत कामगारांना केला जात, असल्याची माहिती महापालिका नियोजन विभागाने दिली आहे. यामध्ये बिर्याणी, पुलाव आणि खिचडीसोबत या अन्य पदार्थाचा समावेश होत असल्याने सातत्याने एकच पदार्थ प्रत्येक दिवशी दिला जाणार नाही. मात्र, पदार्थ बनवण्याचा निर्णय घेतला असला तरी खराब होणाऱ्या अन्नाबाबतचा प्रश्न कायमच आहे. त्यामुळे दोन ते तीन नगरसेवकांमागे एक कम्युनिटी किचन तयार करून याचे वाटप केल्यास नागरिकांना चांगल्याप्रकारचे जेवण मिळेल आणि तक्रारही कमी होतील,असे खुद्द काही सहायक आयुक्तांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: बोटांना सूज किंवा जळजळ होणे कोरोनाचे नवे लक्षण!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -