घरताज्या घडामोडीस्थायी समिती बैठकीनंतर शिवसेना - भाजपात गदारोळ

स्थायी समिती बैठकीनंतर शिवसेना – भाजपात गदारोळ

Subscribe

भाजप नगरसेवकांनी यशवंत जाधव यांच्या कार्यालयासमोर दरवाजातच घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे दुसरीकडे शिवसेना नगरसेवकही पुढे सरसावले आणि त्यांनीही प्रतिघोषणा दिल्या.

कंत्राटदाराला धमकावल्या प्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याबाबत हरकतीच्या मुद्द्याद्वारे चर्चा घडविण्याअगोदरच अध्यक्ष जाधव यांनी सभा तहकूब केल्याने भाजप गटनेते व सदस्य संतप्त झाले. भाजप नगरसेवकांनी यशवंत जाधव यांच्या कार्यालयासमोर दरवाजातच घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे दुसरीकडे शिवसेना नगरसेवकही पुढे सरसावले आणि त्यांनीही प्रतिघोषणा दिल्या. परिणामी मोठा गदारोळ झाला, घोषणायुद्ध झाले. फक्त हाणामारी होणे बाकी होते.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना कार्यालयात जाण्यास भाजप नगरसेवकांनी मज्जाव केला. त्यामुळे जाधव आणि सेना नगरसेवकांनी आक्रमक रूप धारण केले. सुदैवाने पालिका सुरक्षा अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन हे प्रकरण शांत केल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत माहिती देताना भाजप गटनेते प्रभाकर शिंदे म्हणाले की, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एका कंत्राटदाराला फोन करून धमकावले होते. त्यावरून आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आज स्थायी समितीच्या बैठकीत प्रारंभीच हा विषय हरकतीच्या मुद्द्याद्वारे मला उपस्थित करायचा होता. मात्र जाधव यांनी बोलू न देता कामकाजाला सुरुवात केली. आम्ही शांत राहिलो, बैठक झाल्यावर मी हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र अध्यक्षांनी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना हरकतीचा मुद्दा घेऊ दिला. नंतर मी हरकतीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्ष यांनी मला बोलू न देता सभा तहकूब केली, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

- Advertisement -

यशवंत जाधव हे आम्हाला बैठकीत बोलू देत नाहीत. कंत्राटदारांना धमकावतात व गलिच्छ भाषा वापरतात आणि मनमानी कारभार करीत आहेत, असा आरोप करीत प्रभाकर शिंदे यांनी यशवंत जाधव यांचा निषेध व्यक्त केला. तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपच्या घोषणा ऐकताच यशवंत जाधव यांच्या दालनाच्या बाहेर येऊन दरवाजात ठिय्या आंदोलन करणारया भाजपविरोधात प्रतिघोषणाबाजी करीत चोख उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी,शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक रूप धारण करीत भाजप नगरसेवकांसमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपने केलेले सर्व आरोप निराधार आहेत. ‘त्या’ कंत्राटदाराच्या प्रकरणाच्या आडून मला ब्लॅकमेलिंग करण्याचा भाजपचा प्रयत्न करीत आहे की काय, अशी शंका येत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच, आज स्थायी समितीच्या बैठकीत कंत्राटदाराच्या प्रकरणावरून सुरुवातीपासूनच गदारोळ, गोंधळ घालण्याचा प्लॅन होता, असा आरोपही जाधव यांनी केला आहे.

- Advertisement -

बैठकीच्या प्रारंभी प्रभाकर शिंदे यांनी, गोंधळ सुरू केला होता मी त्यांना कामकाज करू द्या, असे सांगितले होते.
नंतर कामकाज झाल्यावर मी शिंदे यांना हरकतीचा मुद्दा मांडण्यास सांगितले होते मात्र त्यांनी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना बोलण्यास सांगितले.नंतर शिंदे हे राऊत यांनी मांडलेल्या विषयावरही बोलले. त्यानंतर मी सभा तहकूब केली. त्यावर पुन्हा शिंदे यांनी गदारोळ घातला व मला बोलू दिले नाही,असे सांगत उगाच आकांडतांडव केले. वास्तविक, जेव्हा त्यांना संधी दिली तेव्हाच ते का नाही बोलले आणि नंतर सभा संपल्यावर बोलायचा आग्रह धरणे चुकीचे आहे. तेथे गोंधळ न घालता आल्याने त्यांनी माझ्या दालनातर्फे मुद्दाम तहान मांडून घोषणाबाजी केली, गदारोळ घातला आणि मला माझ्या दालनात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला.

भाजप नगरसेवकांनी, ” चोर है चोर है स्थायी समिती अध्यक्ष चोर है”, “नही चलेगी, नहि चलेगी, दादागिरी नहीं चलेगी”, ” पालपुटया स्थायी समिती अध्यक्षांचा निषेध असो” अशा घोषणा दिल्या. तर शिवसेना नगरसेवकांनी, ” हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा”, ” शिवसेना झिंदाबाद”,” ये अंदर की बात है, प्रभाकर शिंदे हमारे साथ है” अशा घोषणाबाजीद्वारे भाजप नगरसेवकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -