घरमुंबई92 लाख रुपयांचा अपहार करुन शेतकर्‍यांची फसवणूक

92 लाख रुपयांचा अपहार करुन शेतकर्‍यांची फसवणूक

Subscribe

मुख्य आरोपीसह दोघांना अटक; इतर चौघांचा शोध सुरु

सुमारे 92 लाख रुपयांचा अपहार करुन शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या अधिकार्‍यासह दोघांना पायधुनी पोलिसांनी अटक केली. सौरंभ सुरेश होरांबे आणि सागर मोहन शिंदे अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत इतर चौघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात सुधीर ओमप्रकाश मल्होत्रा, विलास भगवंत परुळेकर, अनंत शिवराम मोरे आणि विवेक सुभाष वडतकर यांचा समावेश आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

तक्रारदार मशिदबंदर येथील महाराष्ट्र स्टेट सहकारी मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमध्ये लेखापाल म्हणून काम करीत असून ही संस्था केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिपत्याखाली राबविली जाते. त्यात आएएस दर्जाचे अधिकारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत संस्थेचे कार्यालय आहे. शेतकर्‍यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून ही संस्था विविध योजनेद्वारे काम करते. 2017/2018 या वर्षांत धानसाठी एक हजार पाचशे पन्नास आणि 2018-2019 या वर्षांसाठी धानसाठी एक हजार सातशे पन्नास, मकासाठी एक हजार सातशे, ज्वारीसाठी दोन हजार चारशे तीस, मुगासाठी सहा हजार नवशे पंच्याहत्तर, उडीदसाठी पाच हजार सहाशे प्रति क्विंटल आणि सोयाबीनसाठी तीनन हजार तीनशे नव्यानऊ प्रति क्विंटल असा हमीभाव केंद्र शासनाने निश्चित केला होता. सप्टेंबर 2018 ही योजना सुरु झाली. त्यासाठी भारतीय खाद्य निगम कंत्राट देण्यात आले होते. हा सर्व व्यवहार ऑनलाईन होतो.

- Advertisement -

जुलै 2019 रोजी महाराष्ट्रातील काही शेतकर्‍यांना हमी भावाप्रमाणे रक्कम देताना रायगड, ठाणे, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, परळी आदी ठिकाणी कमी रक्कम देण्यात आल्याचे संस्थेच्या लक्षात आले. याबाबत संस्थेने नेमी या कंपनीला त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यावेळी कंपनीचा सौरंभ होरांबे याने कंपनीचा गोपनीय आयडी पासवर्डचा वापर करुन ज्या शेतकर्‍यांना या योजनांची रक्कम पाठवायची होती, ती रक्कम बँक खात्यात जमा न करता इतर हितसंबंधातील संशयित आरोपी सुधीर ओमप्रकाश मल्होत्रा, विलास भगवंत परुळेकर, अनंत शिवराम मोरे, सागर मोहन शिंदे, विवेक सुभाष वडतकर व इतरांच्या बँक खात्यात जमा केली होती. सौरंभने स्वतच्या फायद्यासाठी नेमी कंपनीत काम करताना केंद्र-राज्य शासनाकडून शेतकर्‍यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या हमी भावातील एकूण 92 लाख 49 हजार 808 रुपये शेतकर्‍यांचा बँक खात्यात जमा न करता फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी 408, 409, 420, 120 ब, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत शनिवारी सौरंभ तर सोमवारी सागर या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने 14 नोव्हेंबरर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर आरेोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमेाहीम सुरु केली आहे. सौरंभने अशा प्रकारे इतर ठिकाणी शेतकर्‍यांच्या पैशांवर डल्ला मारला आहे का याचाही पोलीस तपास करीत आहेत. आतापर्यंत ही फसवणुक 92 लाखांची असली तरी ती रक्कम त्यापेक्षा अधिक असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -