घरमुंबईशिवसेना भवनाच्या अंगणात सेनेला शह देण्याची शेलारांची रणनीती!

शिवसेना भवनाच्या अंगणात सेनेला शह देण्याची शेलारांची रणनीती!

Subscribe

भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आणि वांद्रे पश्चिम भागाचे आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात व शिवसेना भवनाच्या अंगणात सेनेला आव्हान देण्याची तयारी चालवली आहे. माहीम विधान सभा मतदार संघाचे प्रभारी असलेल्या शेलार यांनी या विभागाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. रविवारी त्यांनी शिवाजी पार्कच्या परिसरात कोरोना उपाययोजना म्हणून निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवून शिवसेनेसमोर आव्हान उभे केले आहे. भाजपतर्फे आज दादरच्या शिवाजी पार्क परिसरात विशेष मोहीम राबवून कार्यकर्त्यांनी जंतुनाशक फवारणी केली. दादर, प्रभादेवी, माहीम परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भाजपचा माहीम विधानसभा पदाधिकार्‍यांच्या वतीने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली माहीम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर आणि जितेंद्र राऊत यांच्या पुढाकाराने रविवारी दादर शिवाजी पार्क महापालिका वॉर्ड क्रमांक १९१ या संपूर्ण परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत आशिष शेलार हे माहीम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. तशी त्यांनी सुप्त इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांनी पुन्हा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. तिथून ते निवडून आले. युती तुटल्याने या माहीम विधानसभा मतदार संघातून भाजपने कोणतीही तयारी नसल्याने विलास आंबेकर यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी मनसेने तो काबीज केला होता. त्यामुळे सेना आणि मनसेच्या या बालेकिल्ल्यात भाजपला यश मिळवणे कठीण मानले जात होते. तरीही भाजपने विलास आंबेकर यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला विजय मिळवणे कठीण असल्याने त्यांनी किमान डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून विशेष मेहनत घेतली. त्यामुळे शिवसेनेचे सदा सरवणकर हे विजयी झाले आणि मनसेचे नितीन सरदेसाई हे दुसऱ्या क्रमांकावर व भाजपचे आंबेकर हे तिसऱ्या स्थानावर मत मिळवून त्यांनी सेना व मनसेच्या उमेदवारापुढे एक आव्हान निर्माण केले होते.

- Advertisement -

मात्र मागील निवडणुकीत एकत्र निवडणूक लढवूनही शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत वेगळी चूल मांडत भाजपला कट्टर विरोधक असल्याचे जाहीर केल्याने भाजपनेही सेनेला आव्हान देण्याची रणनीती आखली आहे.
माहीम विधानसभा क्षेत्राची जबाबदारी भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांच्याकडे असल्याने त्यांनी हा विधानसभा मतदार संघ काबीज करण्याची रणनीती आखली आहे. आगामी महापलिका निवडणुकीच्या रणनीतीसह पुढील विधासभेचीही तयारी भाजपने चालवली आहे. त्यामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांना मातीत लोळवण्यासाठी आतापासूनच शेलार यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे २०२२ च्या महापालिका निवडणुका आणि नंतर २०२४ ची विधानसभा निवडणुका यांच्या तयारीचा भाग म्हणून त्यांनी कोरोनाच्या काळात या भागात अन्नधान्य वाटप तसेच रविवारी शिवाजी पार्क परिसरात सॅनिटायझेनचा कार्यक्रम घेतला असल्याचे बोलले जात आहे. माहीम विधानसभा मतदार संघात जर आपल्याला मिळाली तर किंवा पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणत सेनेच्या नाकावर टिचून विजय मिळवायचा असाच चंग शेलार आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -