राज्यसभा निवडणूक मनसेचा भाजपला पाठिंबा, भाजप आमदार आशीष शेलार यांचा दावा

Ashish Shelar said that MNS supported BJP in Rajya Sabha elections

राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचा दावा भाजपाचे नेते आमदार आशीष शेलार यांनी बुधवारी केला. मात्र, याबाबत मनसेकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत १०० टक्के विजय भाजपचाच होईल, असा दावा शेलार यांनी पुन्हा एकदा केला आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान मनसेचे एकमेव आमदार प्रमोद पाटील हेदेखील उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शेलार यांनी वरील दावा केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजआपण भेट घेतली. मनसे आमदाराचे मत आम्हाला मिळावे, अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांच्याकडे केली असता त्यांनी त्यास तत्काळ समर्थन दिले. राज्यसभा आणि विधान परिषदेसाठीही त्यांनी समर्थन देण्याचे मान्य केले आहे, असे शेलार यांनी सांगितले.त्यांच्या मतामुळे आमचा विजय सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या पायाखालची वाळू सरकली –

शक्तीप्रदर्शन तोच करतो ज्याला विजयाची खात्री नसते. आकडे असतील तर प्रदर्शनाची गरज नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका शेलार यांनी आघाडीवर केली. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.