घरमुंबईसावधान... लोकलमध्ये बॅग चोर्‍या वाढल्या

सावधान… लोकलमध्ये बॅग चोर्‍या वाढल्या

Subscribe

यावर्षी १५०२ बॅगांची चोरी

लोकलमधून मोबाईल चोरीबरोबरच बॅग चोरीच्याही तक्रारी वाढत आहेत. चोरांच्या या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून प्रवाशांना सावधगिरीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही २०१७ च्या तुलनेत यावर्षी ५० टक्क्यांपेक्षा जास्त बॅग चोर्‍या झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.लोकलच्या गर्दीमध्ये अनेक प्रवासी आपले सामान कॅरियरवर ठेवतात. बर्‍याचदा हे प्रवासी लोकलमधून उतरताना आपली बॅग विसरतात, तर काही वेळेस चोर या सामानावर ‘हात साफ’ करतात. चोरांच्या ‘हात सफाई’मुळे अनेकांना आपल्या मौल्यवान वस्तूंना मुकावे लागते. रेल्वे पोलिसांकडून अशा बॅग चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसली असून प्रवाशांना सावधगिरीच्या सूचना देण्यात येत आहेत. पण लोकलमधील या बॅग चोरीच्या घटना कमी नाही, तर दिवसेंदिवस वाढत असल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे.

2017 मध्ये बॅग चोरीच्या 1 हजार ५१ घटनांची नोंदणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे. तर त्यातून फक्त ११८ बॅगा शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. आता २०१८ पूर्ण होण्यापूर्वीच या वर्षीच्या नोव्हेंबर २०१८ पर्यंत १५०२ इतक्या बॅग चोरीच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. मात्र त्यातून १३० बॅगा शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे २०१७ च्या तुलनेत यावर्षी ५० टक्क्यांनी मुंबई लोकलमधून आणि रेल्वे स्थानकावरून बॅग चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisement -

रेल्वेतील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाइल लंपास करणार्‍या टोळ्या सर्वत्र सक्रिय आहेत. मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमधून दररोज किमान २० मोबाईलची चोरी होत असते. आता अधिक फायद्यासाठी या टोळ्यांनी बॅग चोरण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई रेल्वे विभागात बॅग चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ अखेरीस लोकल ट्रेनमधून बॅग चोरीच्या १५०२ घटना उघडकीस आल्या आहेत. बॅग तसेच मोबाईल चोरांना रोखण्यासाठी लोकल ट्रेनमधून साध्या वेषातीेल पोलीस तैनात करणार असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र पोलिसांच्या अनेक उपाययोजनांवर पाणी फेरत चोरट्यांनी आता बॅग चोरीवर लक्ष केंद्रित केले आहे.

मोबाईल ट्रेसिंगमुळे बॅग चोरीत वाढ

पूर्वी लोकल ट्रेनमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण मोठे होते. मात्र मोबाईल ट्रेसिंगमुळे कित्येक मोबाईल चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. त्यामुळे आता मोबाईल चोरी करताना चोरटे सावध झाले आहेत. आता चोरट्यांनी एक नवीन शक्कल लढवत आपला मोर्चा बॅग चोरीकडे वळवला आहे. कारण बॅगला ट्रेस करता येत नाहीत. अशी माहिती पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. बॅग चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. २०१७ च्या तुलनेत यावर्षी ५०० बॅगा चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisement -

सीसीटीव्हीचा फायदा काय?

मुंबईच्या रेल्वे स्थानकावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यातील कित्येक कॅमेरे नादुरुस्त आहेत. रेल्वे स्थानकाच्या दुरुस्तीकामात अनेक कॅमेर्‍यांची दिशा बदलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कक्षेबाबत गोंधळ आहे. कॅमेर्‍यांच्या लेन्सवर धूळ साचल्यामुळे छायाचित्रण योग्य पद्धतीने होत नाही. तसेच कॅमेर्‍यांची निगा राखली जात नसल्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी ठरत आहेत. सध्या रेल्वे स्थानकावरून प्रवाशांच्या सामानाची चोरी होण्याच्या घटना वाढत आहेत.

पूर्वी प्रवाशांच्या बॅगा चोरीला जात तेव्हा प्रवासी पोलीस ठाण्यात तक्रार करत नसत. मात्र आता प्रवासी बॅग चोरीच्या तक्रारी दाखल करत आहेत. त्यामुळे हा आकडा वाढला आहे. आम्ही बॅग चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर पोलिसांची गस्त वाढवली आहे.
-पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, लोहमार्ग रेल्वे पोलीस

चोरीची   नोंद   जप्त

२०१७  – १०५१  – ११८
२०१८ (नोव्हेंबर )- १५०२ -१३०

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -